दापोली : सातबारा उताऱ्यावर फेरफार नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारल्याप्रकरणी ग्राम महसुल अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी युनिटने बुधवारी (ता. २५) सापळा रचून केली. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाल्याने एकच खळबळ उडालीआहे. याप्रकरणी श्रीमती श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०), ग्राम महसुल अधिकारी, सजा नानटे, ता. दापोली, जि. रत्नागिरी (सध्या रा. जालगाव, लष्करवाडी, विद्यानगर, गल्ली क्र. ३) यांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
तक्रारदार व त्यांच्या मित्रांने मौजे तेरे वायंगणी, ता. दापोली येथील खाते क्रमांक ७४, गट क्रमांक ३११, क्षेत्र ७८ गुंठे जमीन एकत्रीत खरेदीखताद्वारे विकत घेतली होती. या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे नावे नोंद करण्यासाठी तक्रारदारांनी दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी तलाठी कार्यालय, सजा नानटे येथे ग्राम महसुल अधिकारी श्रद्धा बंडे यांची भेट घेतली. त्यावेळी फेरफार नोंद करून ७/१२ उतारा देण्यासाठी त्यांनी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदारांनी तहसीलदार कार्यालय, दापोली येथे संबंधित अधिकाऱ्यांची पुन्हा भेट घेतली असता मंजूर फेरफार व दाखल झालेल्या ७/१२ उताऱ्याची प्रत देण्यासाठी पुन्हा १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. पडताळणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी १० हजार रुपयांची मागणी केली व ती रक्कम पंचासमक्ष स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परीक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अविनाश पाटील, पोलीस उपअधीक्षक, रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, सपोफौ उदय चांदणे, पोलीस हवालदार तसेच श्रेया विचारे, दीपक आंबेकर, राजेश गावकर व समिता क्षिरसागर आदींचा सहभाग होता. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

