दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले तरीबंदर येथे ग्रामपंचायतीजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मासेमारी बोटींना मंगळवारी सायंकाळी उशिरा अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत दोन ते तीन मासेमारी बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या. या घटनेत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून आंजर्ले परिसरातील मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात झेपावत असल्याचे पाहून स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, दापोली नगरपंचायतीकडे स्वतःचा अग्निशमन बंब उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. परिणामी खेड येथून अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्याची प्रतीक्षा करावी लागली. तोपर्यंत आग आणखी पसरून शेजारी उभ्या असलेल्या इतर बोटी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. आगीचे स्वरूप भीषण असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी पाण्याच्या टाक्या, बादल्या आणि अन्य उपलब्ध साधनांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून शॉर्टसर्किट, ज्वलनशील साहित्य किंवा अन्य कोणत्या कारणामुळे आग लागली याचा तपास सुरू आहे. आग पूर्णपणे विझल्यानंतरच नुकसानीचे अचूक स्वरूप आणि कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या दुर्घटनेत जळालेल्या बोटींची किंमत, त्यावरील मासेमारी साहित्य, इंजिन आणि इतर उपकरणे यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असून त्यानंतर नुकसानग्रस्तांची संख्या आणि नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, दापोलीसारख्या किनारी तालुक्यात अद्याप स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी तसेच अशा आपत्कालीन घटनांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक पातळीवर सुसज्ज अग्निशमन व्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. आंजर्ले येथील या आगीने केवळ काही बोटी जाळल्या नाहीत, तर किनारपट्टीवरील आपत्कालीन यंत्रणेतील उणिवाही पुन्हा एकदा अधोरेखित केल्या आहेत.