दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ल्याची तटबंदी मुसळधार पावसानंतर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटबंदीचा मोठा भाग ढासळला आहे.
विशेष म्हणजे, किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नुकतेच एका फेजच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र अल्पावधीतच तटबंदी कोसळल्याने करण्यात आलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेमुळे इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, तसेच किल्ल्याचे दर्जेदार संवर्धन करावे, अशी मागणी जोर धरत आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देत असल्याने या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.पुरातत्त्व विभागाने या घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
