दापोली : दापोली तालुक्यातील लाटवण– पिंपळगाव (रामवाडी) येथील नदीवर जिल्हा परिषदेकडून उभारण्यात येत असलेला पूल पूर्ण होण्याआधीच कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, हा प्रकार जिल्हा परिषद अध्यक्षांच्या तालुक्यातच घडल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाचे बांधकाम काही दिवसांपासून सुरू होते. सुरुवातीपासूनच या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे, बांधकामात तांत्रिक त्रुटी असल्याचे आणि देखरेखीचा अभाव असल्याचे आरोप वारंवार करण्यात येत होते. मात्र संबंधित यंत्रणेकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना बहुतांश ठिकाणी बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार आणि शासकीय विभाग कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र याच पावसाळ्याच्या तोंडावर येथे उभारण्यात आलेला पूल निकृष्ट कामामुळे कोसळल्याची घटना समोर आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
अचानक पुलाचा एक मोठा भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, घटनेच्या वेळी त्या ठिकाणी कोणतेही कामगार किंवा नागरिक नसल्याने जीवितहानी टळली. मात्र हा पूल पूर्ण झाल्यानंतर वापरात असताना कोसळला असता, मोठी जीवितहानी झाली असती, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून “जनतेच्या कराच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या कामांचा दर्जा इतका खालावला आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे. कामाच्या गुणवत्तेची तपासणी न करता बिलांचे भुगतान करण्यात आले का, याचाही सखोल तपास व्हावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच नव्याने दर्जेदार व सुरक्षित पूल उभारावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.
