दापोली : मोबाईलचं सिम कार्ड काढण्याच्या नादात तोंडात ठेवलेली पिन श्वसननलिकेतून फुफ्फुसाच्या एका कोपऱ्यात अडकलेल्या महिलेवर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून ती पिन बाहेर काढली.
रत्नागिरी येथील एका २३ वर्षीय महिलेने मोबाईलचं सिम बदलताना सिम कार्ड बदलण्याची पिन तोंडात ठेवली होती. चुकून ती पिन गिळल्यामुळे, त्या महिलेला श्वास घेण्यास किंवा गिळताना काही त्रास होत नसल्याने, ती डॉक्टरांकडे न जाता रात्री घरीच राहिली. ही घटना २० ऑगस्ट रोजी घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने रत्नागिरी येथे सर्जन डॉ. रविंद्र गोंधळेकर यांना दाखवले. त्यांनी अन्ननलिकेची स्कोपी केली, परंतु त्यांना ती पिन दिसली नाही. त्यानंतर त्यांनी छातीचा एक्स-रे व सिटी स्कॅन केला, ज्यामध्ये उजव्या बाजूच्या श्वसननलिकेत पिन अडकलेली आढळली. डॉ. गोंधळेकर यांनी लगेच त्या महिलेला वालावलकर रुग्णालयात जाण्यास सांगितले.
वालावलकर रुग्णालयात दाखल होताच, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. राजीव केणी यांनी तपासणी केली आणि नातेवाईकांना तातडीने ऑपरेशन करून श्वसननलिकेत अडकलेली पिन काढण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा…राजापूर : अणुस्कुरा घाटात दरड कोसळली वाहतूक ठप्प
नातेवाईकांनी क्षणाचा विलंब न करता वालावलकर हॉस्पिटलच्या कान ,नाक ,घसा तज्ज्ञांवर विश्वास ठेवून ऑपरेशनची तयारी दाखवली. डॉ. राजीव केणी यांनी ऑपरेशनपूर्व तपासण्या आणि तयारी तत्काळ करून घेतली. त्यांनी अत्यंत कुशलतेने ब्रोन्कोस्कोपी करून उजव्या फुफ्फुसाच्या श्वसननलिकेत अडकलेली पिन बाहेर काढली. ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया सहजरित्या झाल्यामुळे, रुग्णाच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. ब्रोन्कोस्कोपी ही शस्त्रक्रिया अवघड असते, कारण यात रुग्णाच्या जीवाला धोका असतो आणि भूल देणेही खूप कठीण असतं. या शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याचे अवघड काम डॉ. लीना ठाकूर, डॉ. गौरव बावीसकर आणि त्यांच्या टीमने अत्यंत चोखपणे पार पाडले.