दापोली : दापोली तालुक्यातील दाभोळ (आघारी-भिवबंदर) येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प, चिखलगाव येथील बॉक्साइट मायनिंग प्रकल्प आणि देवके येथील नवेनगर प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी दापोली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र विरोध दर्शविला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि ओणणवसे गावचे रहिवासी अनिल खोत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करीत पक्षाला घरचा आहेर दिला. “मी जन्मापासून संघाचा आणि भाजपचा कार्यकर्ता आहे; मात्र कोकणावर घातक प्रकल्प लादले जात असतील, तर मी गावकऱ्यांसोबत ठामपणे उभा राहणार,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

खोत म्हणाले की, कोकणातील जमिनी, आंबा-काजूच्या बागा, जलस्रोत, पर्यावरण आणि मत्स्यव्यवसाय यांचे अस्तित्व या प्रकल्पांमुळे धोक्यात येऊ शकते. तटकरे साहेब काय करतील, योगेश कदम किंवा सिद्धेश कदम काय करतील, याची वाट पाहण्यापेक्षा ग्रामस्थांनी एकजुटीने रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे. “आपले गाव जगले, तरच राजकीय पक्ष जगतील; गावच उद्ध्वस्त झाले, तर या राजकारणाचा उपयोग काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दाभोळ येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी सिध्देश कदम याने ३५ एकर जमीन खरेदी झाल्याचा पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा खोत यांनी केला. तसेच २५० एकर जमिनीसंदर्भात टोकण दिल्याचेही त्यांनी सांगितले. या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. संबंधित प्रकल्पाबाबत माहिती नसल्याचे सांगितले जात असेल, तर प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, याचा ग्रामस्थांनी विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रकल्पांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका. बाहेरील लोकांना रोजगार मिळेल आणि स्थानिक मात्र विस्थापनाच्या संकटात सापडतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. “स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका,” असा टोलाही त्यांनी लगावला.

दाभोळ, चिखलगाव आणि देवके येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन लढा उभारावा. प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रकल्पविरोधी ठराव करावा आणि कोणत्याही आर्थिक आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन खोत यांनी केले. या प्रकल्पांना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प पुढे नेऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली.