रत्नागिरी : दापोली तालुक्यातील आंजर्ले-सावणे परिसरात मंगळवारी बुडाल्याची घटना ताजी असतानाच सालदुरे येथे आणखी एक धोकादायक प्रकार घडला.

समुद्रकिनाऱ्यालगतच्या खाडी परिसरात वाहन चालवत स्टंट करण्याच्या प्रयत्नात पुण्यातील पर्यटकांची मर्सिडिज कार चिखलात अडकली. सुदैवाने स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत वाहनातील महिला, पुरुष आणि लहान मुलांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर जवळपास तासभर प्रयत्न करून भरती सुरू होण्यापूर्वी कारही बाहेर काढण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी उशिरा पुण्यातील काही पर्यटक सालदुरे किनाऱ्याजवळ फिरण्यासाठी आले होते. यावेळी खाडीच्या परिसरात वाहन चालवत स्टंट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ओलसर व चिखलयुक्त भागात कार रुतल्याने ती पूर्णपणे अडकून पडली. भरतीची वेळ जवळ येत असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती.

घटनेची माहिती मिळताच सालदुरे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनातील लहान मुले, महिला आणि पुरुष यांना प्रथम सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यानंतर निवेदन शेवडे, रुपेश शेवडे आणि विपुल शेवडे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी मोठ्या मेहनतीने कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. चिखल आणि पाण्याची पर्वा न करता जवळपास तासभर सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर भरती सुरू होण्यापूर्वी वाहन सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या मदतीबद्दल पर्यटकांनी ग्रामस्थांचे आभार मानत त्यांचे कौतुक केले.

दरम्यान, अंजर्ले, हर्णे, मुरुड आणि आसपासच्या किनारी भागांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर वाहन चालविणे, स्टंटबाजी करणे आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार वारंवार घडत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. यापूर्वीही किनारपट्टीवर वाहनांच्या बेदरकार वावरामुळे पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर काही काळ प्रशासनाने किनाऱ्यावर वाहनांना प्रतिबंध घातला होता. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा अशा घटना घडत असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

समुद्रकिनाऱ्यावरील निष्काळजी वाहनचालना केवळ वाहनधारकांसाठीच नव्हे, तर किनाऱ्यावर फिरणाऱ्या पर्यटक आणि ग्रामस्थांच्या जीवितालाही धोका निर्माण करणारी ठरत असल्याचे मत पर्यटनप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.