दापोली : दापोली शहराच्या मध्यवर्ती उदयनगर परिसरातील तब्बल ६२१ गुंठे वक्फ जमिनीच्या व्यवहारावरून दापोलीच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. १८९७ पासून मुस्लिम समाजाच्या उपयोगासाठी वक्फ करण्यात आलेल्या या जमिनीवर गेल्या काही वर्षांपासून बिल्डर लॉबीचा डोळा होता, असा गंभीर आरोप भाजपाचे माजी स्वीकृत नगरसेवक तथा सध्या शिवसेनेचे कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे.

सावंत यांच्या आरोपानुसार, उदयनगर परिसरातील या मौल्यवान जमिनीच्या विक्रीचा घाट घालून संस्थेलाच भूमिहीन करण्याचा प्रकार करण्यात आला. या व्यवहारात १८० गुंठे आणि ४४१ गुंठे, अशा दोन स्वतंत्र खरेदीखतांद्वारे एकूण ६२१ गुंठ्यांच्या जमिनीचा व्यवहार झाल्याचा त्यांचा दावा आहे. विशेष म्हणजे, मुस्लिम समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उपयोगासाठी असलेल्या या जमिनीचा कथितरीत्या कवडीमोल दराने व्यवहार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.या प्रकरणात रखांगे आणि भेकरे या बिल्डर व्यावसायिकांची नावे पुढे येत असून, त्यांनी संबंधित जमीन व्यवहारात भूमिका बजावल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

 एवढ्यावरच न थांबता, एका राजकीय व्यक्तीसह दापोलीतील उपनगराध्यक्ष खाली दखल यांचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा सावंत यांनी केला आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.‘जमीन विकणारे आणि जमीन खरेदी करणारे भूमाफिया आहेत’, असा थेट आरोप करत सावंत यांनी या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपण स्वतः उदयनगर परिसरातील स्थानिक रहिवासी असल्याचे सांगत, या जमिनीच्या व्यवहारामुळे परिसरातील नागरिकांमध्येही तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी नमूद केले.

१८९७ पासूनचा इतिहास; आता महसूल विभागाच्या भूमिकेकडे लक्ष

या वक्फ जमिनीचा इतिहास तब्बल १८९७ पर्यंत जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. एका मुस्लिम व्यक्तीने समाजाच्या उपयोगासाठी ही जमीन वक्फ केल्यापासून ती संबंधित संस्थेच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वक्फ मालमत्तेचा दर्जा असलेल्या या जमिनीची विक्री कोणत्या अधिकाराने आणि कोणत्या प्रक्रियेतून झाली, हा आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरत आहे.

दोन खरेदीखतांद्वारे ६२१ गुंठ्यांचा व्यवहार झाल्याच्या आरोपामुळे महसूल नोंदी, वक्फ मालमत्तेचा दर्जा, खरेदीखतांची वैधता, व्यवहारातील किंमत आणि संबंधितांना मिळालेले अधिकार यांची चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूकंप?

दरम्यान, दापोली नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच हा जमीन व्यवहार ऐरणीवर आल्याने त्याला राजकीय रंगही चढला आहे. नगराध्यक्षपदासाठी तयारी करणाऱ्या एका बड्या नेत्याला या आरोपांमुळे राजकीय धक्का बसल्याची चर्चा दापोलीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

विशेष म्हणजे, संजय सावंत यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत भाजपातून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे सावंत यांनी उपस्थित केलेल्या या प्रकरणाला आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

आता ६२१ गुंठ्यांच्या या कथित वक्फ जमीन व्यवहाराची महसूल विभाग, वक्फ प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणा चौकशी करणार का? खरेदीखतांची वैधता तपासली जाणार का? आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार का? याकडे दापोलीकरांचे लक्ष लागले आहे.