भाजपा नेते व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वीज बिलाची वसूली या मुद्द्य्यावरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. तसेच, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला.

जुलमी पद्धतीने त्यांच्या बिलामधून थकबाकी कापता येणार नाही –

शेतकऱ्यांच्या ऊस बिलामधून त्यांचे थकीत वीजबील वसूल होणार आहे, यावर बोलताना दरेकर म्हणाले की, “महावितरणने राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वीज बिलाची थकबाकी कारखानदारांकडून वसूल करून द्यावी, अशी विनंती केली होती. साखर आयुक्त शेखर आयुक्त यांनी कारखानदारांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या बिलामधून अशाप्रकारची थकबाकी द्यावी, असा फतवा काढला आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या बिलामधून जुलमी पद्धतीने तुम्हाल वीज थकबाकीची वसूली करता येणार नाही. आज शेतकरी संकटग्रस्त आहे, अडचणीत आहे. यावेळी राज्य सरकारने त्यांना बिलात सूट दिली पाहिजे, माफ केले पाहिजे. अशावेळी जुलमी पद्धतीने त्यांच्या बिलामधून थकबाकी कापता येणार नाही. ती कापू नये नाहीतर या संदर्भात उग्र आंदोलन करून सरकारला जाब विचारू.”

हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे –

तर, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत, यावर दरेकरांनी सांगितले की, “मला वाटतं हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. संवेदनहीन सरकार दिसतय. कारण, २८ पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही जाग येणार नसेल तर या सरकारला म्हणायचं काय? खरं म्हणजे आजही हिटलरी पद्धतीने या ठिकाणी एसटीकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे की, जर आपण कामावर रूजू झाला नाहीत. आंदोलनात सहभाग घेतला. तर आपली कामातील सेवा समाप्त केली जाईल. म्हणजे कर्मचाऱ्यांनी आपला न्याय हक्क देखील मागायचा नाही. अशा प्रकारचा जुलमी कारभार एसटी महामंडळ व राज्य सरकारचा दिसत आहे. परंतु अशाप्रकारे परिपत्रक काढून जर एसटी कर्मचाऱ्यांवर दबाव आणणार असाल, वेठीस धरणार असाल तर मी आज जाहीरपणे सांगतो की एसटी प्रशासनाच्या संचालकांच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल. मी स्वतः त्या ठिकाणी येईल. त्यामुळे हे परिपत्रक तत्काळ मागे घ्याव, एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारी सेवेत सामावून घेण्याबाबत जो आग्रह आहे त्या संदर्भात बैठक लावून त्यावर भूमिका घ्यावी आणि जर या गोष्टी केल्या नाहीत, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ताकदीने तीव्र लढा उभारू.”

संजय राऊतांवर निशाणा –

“मुंगेरीलाल के हसीन सपने… ज्या ज्या वेळी संजय राऊत यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील गोष्टी केल्या आणि कसे थोबाडावर आपटले हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. उत्तर प्रदेश, बिहार, गोवा सर्व ठिकाणी निवडणुका लढवू. त्या ठिकाणी हा पॅटर्न राबवू… अशा मोठ्या थाटात घोषणा करतात. मात्र निकाल काय येतो, हे वारंवार आपण पाहिलं आहे. परंतु, त्यांना बोलत राहवच लागणार, त्या शिवाय त्यांचं चालूच शकणार नाही.” तसेच, “त्यांना आता चित्रपटाचा शेवट कसा करायचा हे समजत नाही. त्यामुळे अशाप्रकारे दोन इंटरव्हल, पाच तासांचा चित्रपट अशा प्रकारच्या भूमिका त्यांच्या येतच राहतील. कारण, ते गोंधळलेल्या भांबावलेल्या अवस्थेत आहे. सुरुवात तर केली आहे पण कुठं शेवट करायचा यासाठी ते चाचपडत आहेत.” असंही प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर टीका करताना बोलून दाखवलं.