पंढरपूर: सावळय़ा विठुरायाचे आषाढी यात्रेसाठी आता २४ तास दर्शन सुरू झाले आहे. आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन व्हावे म्हणून देवाचा विश्रांतीचा पलंग काढला जातो. १ जुलै ते १८ जुलै पर्यंत या कालावधीत देवाचे दर्शन २४ तास राहणार आहे. देवाचा विश्रांतीचा चांदीचा पलंग विधिवत पूजा करून काढण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आला असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.

वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरेनुसार आषाढी आणि कार्तिकी वारीच्या दरम्यान भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून देव २४ तास उभा असतो. या कालावधीत देवाच्या शेजघरातील विश्रांतीचा पलंग काढला जातो. हा पलंग काढण्याआधी विधिवत पूजा केली जाते.त्या नंतर सकाळी देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला. या वेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या काढून ठेवण्यात आल्या. देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले. आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे. विठ्ठलाच्या व रुक्मिणीमातेच्या पाठी मऊ कापसाचा लोड ठेवण्यात आला आहे, जेणेकरून देवाला शिणवटा येणार नाही. 

देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता रोज पायावर ५०  हजार, तर मुखदर्शनातून ५० ते ६० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे. असे असले तरी पंढरीत  येणाऱ्या भाविकांनी आपल्या आरोग्यासाठी मुखपट्टीचा वापर करावा असे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

नित्यक्रम

पहाटे साडेचार वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल. या काळात फक्त १ तास दर्शन बंद असेल.  यानंतर दुपारी महानैवेद्याला १५ मिनिटे आणि रात्री नऊ वाजता लिंबू पाणी देण्यासाठी १५ मिनिटे दर्शन थांबविण्यात येणार आहे. याशिवाय संपूर्ण दिवस रात्र विठुराया आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देत उभा असणार आहे.