स्थानिक बाजारपेठेत शंभर रुपये प्रतिकिलो असलेली खजूर रमजानच्या मुहुर्तावर चांगलीच वधारली आहे. त्यामुळे देशातील खजूरबरोबरच परदेशातील खजूरही मोठय़ा प्रमाणात उस्मानाबादच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे. इराणी शाखा नावाने प्रसिध्द असलेली खजूर तर यंदा थेट ८०० रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
मुस्लिम समाजबांधवांचा पवित्र रमजान महिना शुक्रवारपासून सुरू झाला. रमजान महिन्यातील रोजासाठी (उपवास) उस्मानाबादच्या बाजारपेठेत देशासह विदेशातील पेंड खजूर आणि विविध प्रकारची फळे दाखल झाली आहेत. या कालावधीत उपवासादरम्यान लागणाऱ्या विविध खाद्यपदार्थाची बाजारात मोठी मागणी वाढते. शहरातील ख्वॉजा नगर, नेहरू चौक या परिसरात दररोज सायंकाळी खाद्य पदार्थाचा मोठा बाजार सुरू होतो. रोजाचा उपवास सोडताना फळांबरोबर खजूरलाही मोठे स्थान मिळते. केनिया इराणी नावाची खजूरपेंड तीनशे रुपये किलो तर सलाम इराणी नावाची खजूर २४० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. सौदी अरेबिया या ब्रॅण्डखाली विकली जाणारी खजूर दोनशे रुपये तर इराणी नावाची खजूरपेंड १३० रुपये किलो या दराने सध्या बाजारात उपलब्ध आहे. भारतातील इंदौर या नावाने प्रसिध्द असलेली खजूरपेंडही मोठय़ा प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. परदेशातील अन्य खजूरच्या तुलनेत याचा दर अत्यंत कमी असल्यामुळे इंदौर खजूरला सर्वाधिक ग्राहक पसंती देत आहेत. प्रतिकिलो ९५ रुपये दराने इंदौर खजूर सध्या बाजारात विकली जात आहे.