राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. या घोषणांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा देखील समावेश होता. शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ केलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं.

या कर्जमाफीला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ असं नावही देण्यात आलं. मात्र, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी बहुप्रतीक्षित कर्जमाफीची घोषणा केली असली तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही किंवा अंमलबजावणी संथ गतीने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. यातच आता पावसाळा देखील तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? असा सवाल विचारला जात होता.

तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार? यावरून विरोधकांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (३१ मे) शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची थेट तारीख सांगितली आहे.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?

“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केलेली आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या ८ ते १० दिवसांत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची परवानगी घेऊन मी ही घोषणा करत आहे”, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे.

“मी कृषीमंत्री आहे म्हटल्यावर काहीतरी सांगितलं पाहिजे. त्यामुळे भविष्यात काही काळजी करण्याचं कारण नाही, महायुतीचं सरकार जनतेबरोबर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिन्ही नेते जनतेसाठीच काम करत आहेत”, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे.