राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. प्रशांत किशोर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. मात्र, याबाबत पक्षाकडून अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांची प्रशांत किशोर यांच्याबरोबर नुकतीच एक बैठक पार पडल्याचं बोललं जात आहे. पण या बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील काही नेते अनभिज्ञ असल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावरही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, या चर्चांमुळे राष्ट्रवादीत खरंच मोठे बदल होतील का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं आहे. प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा असा कोणताही सल्ला दिला नसल्याचं दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या चर्चांवर बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं की, “मला याबाबत माध्यमांमधूनच समजतं आहे. मात्र, ते (प्रशांत किशोर) असं कधीही म्हणालेले नाहीत. असं ते बोललेत किंवा अशी कुठे चर्चा झाली, हे माझ्या ऐकण्यात नाही. त्यांनी असा कुठलाही सल्ला दिलेला नाही”, असं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीच्या चर्चांवर तटकरे काय म्हणाले?
“ते राजकीय रणनीतिकार आहेत, त्यांनी त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्ये जपलं. ते आमच्या पक्षासाठी काम करतात की नाही? हे मला ज्ञात नाही. सुनेत्रा पवार यांची आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली. एक ते दीड महिन्यांपूर्वी त्यांची आणि आमची एकत्रितपणे भेट झाली होती. मात्र, आम्ही आमच्या पक्षाचं संघटन राज्यात उभं करत असताना आम्ही सर्वजण नेहमी फिल्डवरवर काम करत असल्यामुळे जनतेला, तरुणांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना नेमकं काय हवंय? याचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही त्या पद्धतीने पक्षाची बांधणी करत आहोत. सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची केवळ सदिच्छा भेट झाली, म्हणजे लगेच त्यांना राष्ट्रवादीचा सल्लागार म्हणून नेमलं असा अर्थ काढणं चुकीचं. ६ ते ७ तास भेट झाली, असं तुम्ही म्हणत आहात. तसेच त्या बैठकीत खासदार पार्थ पवार हे देखील होते, असं मी माध्यमांमधून ऐकलं. त्यामुळे याबाबत पार्थ पवारच स्पष्टपणे सांगू शकतील. मला असं वाटतंय की फक्त भेट झाली म्हणून लगेच पक्षाच्या रणनीतिकार म्हणून त्यांना नेमलं असं होत नाही”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
