राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ६ दिग्गज नेत्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील व धनंजय मुंडे या नेत्यांनी शाह यांची भेट घेतली. मात्र, या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार हे दिसले नाही. त्यामुळे या सहा नेत्यांनी अमित शाहांची भेट का घेतली? कारण काय? या भेटीत काय चर्चा झाली? सुनेत्रा पवारांना डावलून या नेत्यांनी ही भेट घेतली का? अर्थखात्याची मागणी की पक्षातील अंतर्गत कलह? असे अनेक सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहेत.
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर पक्षात नाराजी असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील नाराजीच्या चर्चांवर आता कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया देत महत्वाचं भाष्य केलं. ‘मला असं वाटतं की ही चुकीची बातमी आहे. पक्षात कोणतीही नाराजी नाही आणि एखादा निर्णय सगळ्यांनाच आवडतो असं होत नाही’, असं सूचक भाष्य दत्तात्रय भरणे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
“आमच्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि दुष्काळाबाबत केंद्राकडून राज्याला चांगली मदत मिळावी अशी मागणी केली. याबरोबरच जे अर्थखातं आहे ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळावं, ही मागणी आमच्या पक्षाच्या सर्व नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे केली”, असं भरणे यांनी म्हटलं.
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर पक्षात नाराजी आहे का?
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील काही जेष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा आहे. काल पक्षाची कोअर कमिटीची बैठकही झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे? या प्रश्नावर बोलताना भरणे म्हणाले की, “मला असं वाटतं की नक्कीच ही चुकीची बातमी आहे. अमित शाह यांना भेटण्याचा निर्णय हा दोन महिन्यांपूर्वीच झाला होता. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी अमित शाह यांना भेटावं आणि राष्ट्रवादीला पुन्हा अर्थखातं दिलं जावं ही मागणी करण्याचा विषय दोन महिन्यांपूर्वीच ठरला होता. त्याप्रमाणे आमच्या सर्व नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली”, असं भरणे यांनी म्हटलं.
‘पक्षातील एखादा निर्णय सगळ्यांनाच आवडतो असं नाही’
पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. या प्रश्नावर बोलताना मंत्री भरणे म्हणाले की, “बैठकी होत असतात. आज देखील आमच्या आमदारांची बैठक होणार आहे. काल देखील आमच्या पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीत चर्चा होत असतात. त्यामुळे एखादा निर्णय सर्वांनाच आवडेल असं होत नाही. त्यामुळे अशा बैठकांमधून एखाद्याच्या मनातील गैरसमज निघत असतात. तसेच आमच्या बैठकीमध्ये पक्षाचं संघटन वाढवण्याबाबतही चर्चा झाली”, असं सूचक भाष्य भरणे यांनी केलं.
