राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असून दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज (१९ सप्टेंबर) नांदेडमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मात्र, ही बैठक आता एका घटनेवरून चांगलीच चर्चेत आली आहे.

दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांनी काजू-बदामवर ताव मारल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. याबाबतचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच शेतकऱ्यांनी देखील यावरून संताप केला आहे.

दरम्यान, ही बैठक संपल्यानंतर खासदार संजय जाधव यांना पत्रकारांनी बैठकीतील काजू-बदामाबाबत प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले आहेत. ५० ते १०० रुपयांच्या बदामावरून राईचा पर्वत करू नका?, दुष्काळ आहे म्हणून कोणी खात नाही का? काजू-बदाम खाल्ले तर काय झालं?, असे उलट प्रश्न करत खासदार संजय जाधव हे पत्रकारांवर भडकल्याचे पाहायला मिळाले.

खासदार जाधव पत्रकारांवर संतापले, काय घडलं?

दुष्काळ आढावा बैठकीत नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांनी काजू-बदामवर ताव मारल्याचा आरोप करत विरोधक टीका करत आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना खासदार संजय जाधव चांगलेच संतापले. जाधव म्हणाले की, “मी माणूसच आहे ना शेवटी. काहीही लहान लेकरांसारखे प्रश्न विचारता. होऊद्या टीका माझ्यावर, ती टीका स्वीकारायला मी तयार आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. सगळ्याच खासदार, आमदारांसमोर काजू-बदाम ठेवलेले होते, त्यामुळे जर कोणी खाल्ले तर काय झालं?”, असं ते म्हणाले आहेत.

‘दुष्काळ आहे म्हणून कोणी खात नाही का?’

“तुमच्यासमोर कोणी काही ठेवलं तर तुम्ही खाणार नाही का? दुष्काळजन्य परिस्थिती आहे तर सगळ्याच गोष्टी बघा मग. कोणाला भूक लागली असेन म्हणून खाल्ले असतील, त्यात एवढी मोठी गोष्ट काय? दुष्काळ आहे म्हणून कोणी खात नाही का? अंबादास दानवे घरी बसून काय करतेत हे माहिती नाही का? जिल्हाधिकाऱ्यांना विचारा ना की येथे काजू-बदाम का ठेवलेत? त्या काजू-बदामची किंमत किती असू शकते, फार-फार तर ५०, १०० रुपये. एवढ्यासाठी तुम्ही राईचा थेट पर्वत करण्याची काय गरज? तुमच्या मीडियाने उचललेला हा फा## धंदा आहे. तुम्ही ज्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, त्याकडे लक्ष केंद्रीत करा. शेतकरी दुष्काळात परेशान आहे, त्यावर तुम्ही बोला. काजू-बदाम खाण्याच्या विषयावर तुम्ही बोलू नका”, असं म्हणत खासदार संजय जाधव हे पत्रकारांवर भडकले.

नेमकी काय घडलं?

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह आदी नेते आणि अधिकारी उपस्थित होते. मात्र, या बैठकीत नेते मंडळी आणि अधिकाऱ्यांसाठी काजू-बदाम ठेवण्यात आले होते असा आरोप विरोधकांनी केला. त्यावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापलं आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी काजू-बदामवर ताव मारल्याने शेतकऱ्यांकडून देखील याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली?

नांदेडमध्ये दुष्काळी आढावा बैठकीत नेतेमंडळी आणि अधिकाऱ्यांनी काजू-बदामावर ताव मारल्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “साधारणपणे आपल्याकडे बैठकीत सुका मेवा ठेवण्याची पद्धत आहे. मात्र, आशा गोष्टी टाळल्या पाहिजे. प्रशासनाने परिस्थिती लक्षात ठेवायला पाहिजे आणि संवेदनशील राहायला पाहिजे.”