मुंबई : भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच प्रवेशद्वार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५१ हजार कोटींचे गुंतवणूक करार दावोसमध्ये पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणुकीबरोबरच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. विशेष म्हणजे करार करणाऱ्या कंपन्यांमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुलाच्या कंपनीने गुंतवणुकीचा करार केला.

जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्याोगमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्य सरकारच्या विविध विभागांचे प्रतिनिधी मंडळ दावोस येथे उपस्थित आहेत. या परिषदेत पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रांतील उद्याोगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणे सुरू केले असून पहिल्याच दिवशी विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीबाबतचे १९ करार करण्यास राज्य सरकारला यश आले. हरित ऊर्जा, अन्नप्रक्रिया, पोलादनिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, डाटा सेंटर, वाहन उद्याोग, विद्याुत वाहन, जहाजबांधणी अशा विविध क्षेत्रांतील ही गुंतवणूक मुंबईसह रत्नागिरी, पालघर, गडचिरोली, अहिल्यानगर या भागांत होणार असल्याने तिथे उद्याोगवाढीसह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. उद्याोग, गुंतवणूक आणि सेवा क्षेत्रांतील या गुंतवणुकीबाबत मुख्यमंत्री, उद्याोगमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रांतील उद्याोगांच्या प्रतिनिधींसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

लोढा समुहाचा करार

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुलाच्या कंपनीने दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारबरोबर करार केला. लोढांची कंपनी डेटा सेंटर उभारणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस तसेच लोढा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक लोढा हे उपस्थित होते. लोढा यांच्या कंपनीचे कार्यालय दक्षिण मुंबईत आहे. मग लोढा यांच्या कंपनीने करार करण्यासाठी दावोसची निवड का केली, असा प्रश्न विचारला जात आहे. विरोधकांनी विदेशी गुंतणूकदार म्हणून लोढांच्या मुलाच्या कंपनीशी करार केल्याबद्दल टीका केली.