मुंबई : दावोसमधील गुंतवणुकीवरून सरकारवर विरोधकांकडून ताशेरे ओढले जात असताना विधान परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोसमध्ये ३१ लाख २५ हजार ८८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला. यातून ४० लाख रोजगारनिर्मिती होणार असून उद्योग, सेवा, कृषी, तंत्रज्ञान, डेटा सेंटर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हरित ऊर्जा अशा विविध क्षेत्रांमध्ये सुमारे १८ देशांमधून थेट परकीय गुंतवणूक राज्यात येण्याची अपेक्षा असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सत्ताधारी सदस्यांच्या नियम २६० अंतर्गत प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना उदय सामंत यांनी उत्तर दिले. दावोस येथील गुंतवणुकीचा एक भाग म्हणून टाटा समूहासोबत मुंबईजवळ देशातील पहिली ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. रायगड–पेण ग्रोथ सेंटर विकसित करण्यात येणार असून येथे १ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. तर, छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे दुसरे ‘वाहन उद्योग केंद्र’ विकसित करण्याची योजना आहे.

तर, कोकणातील पर्यटनाला चालना देण्याबरोबरच त्या भागाला ‘लॉजिस्टिक हब’ म्हणून विकसित करण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील जागतिक कंपनी ‘एनव्हिडिया’सोबत झालेल्या चर्चेमधून महाराष्ट्राला ‘डिजिटल कॅपिटल’ बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. राज्य प्रदूषणमुक्त करण्यासाठी विद्युत वाहन धोरण राबवून वाहनधारकांना टोलमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढविणे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणे आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्यासाठी सरकार आवश्यक उपाययोजना करणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

  • वर्ष – झालेले करार – प्रकल्पाची अंमलबजावणी
  • २०२२ – ८०,५८८ कोटी – ९८ टक्के
  • २०२३ – १,३७,३९३ कोटी – ८० टक्के
  • २०२४ – ३,१६,७३९ कोटी – ७० टक्के
  • २०२५ – १२,२३,०८१ कोटी – ८८ टक्के
  • २०२६ – ३१,२५,८८२ कोटी – प्रक्रिया सुरू

२०२६ च्या दावोसमधील करारांची आकडेवारी

  • विभाग – करार – रक्कम
  • उद्योग – ६७ – १५,१५,१८२ कोटी
  • एमएमआरडीए – १० – १५,१०,६०० कोटी
  • एमएमआरडीए – ०१ – १,००,१०० कोटी