मुंबईतल्या अंडरवर्ल्डमधला कुख्यात डॉन म्हणजे हाजी मस्तान. हाजी मस्तानने त्याचं गुन्हेगारी साम्राज्य मुंबईत पसरवलं होतं. त्याचं मूळ नाव मस्तान मिर्झा असं होतं पण हाजी मस्तान नावाने प्रसिद्ध होता. १९६० ते १९८० या २० वर्षांमध्ये मुंबईतल्या माफिया गँगचा म्होरक्या तो होता. पुढे तो राजकारणातही गेला. याच हाजी मस्तानचा ANI ने घेतलेली मुलाखत पुन्हा एकदा पोस्ट करण्यात आली आहे. १९९३ मध्ये घेण्यात आलेली ही मुलाखत आहे. या मुलाखतीत हाजी मस्तानने अंडरवर्ल्ड आहेच कुठे असा प्रश्न केला आहे. तसंच दाऊदवरही त्याने भाष्य केलं आहे.

मी थोडा खोडकर आहे, गरिबीतून वर आलोय-हाजी मस्तान

मी थोडा खोडकर आहे, सगळेच असतात. मी लहानपणापासून काम करतोय. बॉयलरमध्ये काम केलं आहे, गोदीमध्ये काम केलं आहे. मी मजुदारांचा नेता होतो, त्यानंतर मी सायकलचं दुकान टाकलं, मग विडीचं दुकान टाकलं. अशा सगळ्या परिस्थितीतून मी वर आलो आहे. आताही माझा व्यवसाय आहे. मी जागेचे व्यवहार करतोय. तुमचे अंडरवर्ल्डशी काही संबंध नाहीत का? हे विचारण्यात आल्यावर हाजी मस्तान म्हणाला, कसलं अंडरवर्ल्ड? जमिनीच्या आतमध्ये आहे का काही? अंडरवर्ल्ड कशाला म्हणता तुम्ही मला समजत नाही. क्राईमचं नाव अंडरवर्ल्ड आहे? भारतात अंडरवर्ल्ड आहे? मी मुलाखतीत म्हटलं होतं की मुंबईत अंडरवर्ल्ड वगैरे काही नाही. मी म्हटलं होतं अमेरिकेत आहे अंडरवर्ल्ड आहे. मी म्हटलं की गुंडगिरी आहे. गुंडगिरीचा अर्थ अंडरवर्ल्ड होत नाही. ती सगळेच जण करतात. कलकत्त्याला जा, तिथे बॉम्ब फेकून मारतात. ते काय अंडरवर्ल्ड आहेत का? गुन्हेगार आहेत मुंबईत असं उत्तर हाजी मस्तानने दिलंय.

दाऊद तर माझ्यासमोर बच्चा होता-हाजी मस्तान

यानंतर हाजी मस्तानला विचारण्यात आलं की मुंबईत कुणी डॉन नाही का? वरद राजन मुदलियारचं काय? तर तो म्हणाला वरदराजन मुदलियार तर वारला, आता कुणी मुदलियार नाही मुंबईत. मग दाऊदचं काय? असं विचारण्यात आल्यावर हाजी मस्तान म्हणाला तो तर दुबईला पळून गेला. बाकी कुणी डॉन वगैरे कोण मला माहीत नाही. त्यांचा मार्ग वेगळा माझा मार्ग वेळा. दाऊद माझ्यासमोर बच्चा होता. त्याचा बाप माझा मित्र होता. यापेक्षा मी दाऊदबाबत काय सांगणार? हाजी मस्तानला लोक घाबरतात का? असं विचारलं असता हाजी मस्तान म्हणाला होता असं कधीच होत नाही की लोक मला घाबरतात, कधीच नाही. आता तुम्ही मला विचाराल की तुमच्याबरोबर सुरक्षा आहे का? मी तुम्हाला उत्तर देतो, माझ्याबरोबर कुठलीही सुरक्षा नाही. कारण मी कुणाला घाबरत नाही. माझा अल्लाहवर विश्वास आहे, तोच मारु शकतो आणि तोच वाचवतोही यावर माझा विश्वास आहे. बाकी कुणाचीही ताकद नाही की मला मारतील असंही उत्तर हाजी मस्तानने १९९३ च्या ANI च्या मुलाखतीत दिलं होतं.

Terrorist Dawood Ibrahim
दाऊद इब्राहिम ( फोटो-IEPL)

ज्यांच्यावर अन्याय होतो ते सगळे अल्पसंख्याक-हाजी मस्तान

भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ हा पक्ष स्थापन करुन नऊ वर्षे झाली आहेत. आम्ही सामाजिक कार्य करत होतो. त्यानंतर आम्ही हा पक्ष स्थापन केला. आम्ही पोलिसांशी संवाद साधतो, कुठे काही संकट आलं तर आम्ही लोक पाठवतो आणि लोकांची मदत करतो. मुंबईत स्फोट झाले तेव्हाही आम्ही बरीच कामं केली. निष्पाप लोकांना पोलिसांनी स्फोट प्रकरणात अटक केली होती. आम्ही आंदोलन केलं, मोर्चा काढला होता. निष्पाप लोकांना का पकडता हा आमचा प्रश्न होता. अल्पसंख्याक समाजाचं पोलीस ऐकून घेत नाहीत. मी अल्पसंख्याक म्हणतो त्यात ब्राह्मणही येतात फक्त मुस्लिम नाही. ज्या कुणावर अन्याय होतो आहे तो अल्पसंख्याक आहे. काश्मीरमध्ये ब्राह्मण अल्पसंख्याक आहेत. अल्पसंख्याक लोकांचं दुःख मला ठाऊक आहे. जे मोठमोठ्या महालात राहतात त्यांना हे दुःख कळणार नाही.

What Haji Mastan Said About Dawood
हाजी मस्तानचा १९९३ मधली मुलाखत AnI ने रिपोस्ट केली आहे. (फोटो-संग्रहीत)

भारतात कायदा सुव्यवस्था वगैरे काही प्रकारच नाही-हाजी मस्तान

मी तुम्हाला सांगतो, भारतात कायदा आणि सुव्यवस्था असा काही प्रकार नाहीच. सगळ्या अल्पसंख्याकाना त्रास सहन करावा लागतो. एक म्हणतो मी कोर्टाला मानणार नाही, दुसरा म्हणतो जमुरियतला नाही मानणार नाही. या सगळ्यात बळी आमचा जातो आहे. कायदा आणि सुव्यवस्था पाळली पाहिजे की नाही? मी कुठलाही कायदा तोडलेला नाही. मी कायद्याचं उल्लंघन केलंय याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? नसेल तर मग आम्ही कुठलाही कायदा उल्लंघलेला नाही. मी कुठलाही कायदा तोडलेला नाही.

    देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून राजकीय पक्ष गुंड बाळगून आहेत-हाजी मस्तान

    देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून राजकीय पक्ष गुंड बाळगून आहेत. पण आम्ही असं करणार नाही. जो निवडून येतो तो शपथ घेतो, पण काम करताना आश्वासनं पाळत नाही. आम्ही ३० लाख खर्च करुन १५ हजार खर्च झाले असं नाही सांगणार. आम्ही भ्रष्टाचार करणार नाही. सरकारने यासाठी कायदा आणला पाहिजे की भ्रष्टाचारावर नियंत्रण आलं पाहिजे असंही हाजी मस्तानने म्हटलं आहे. आम्ही सत्तेत आलो तर गरीबी हटवू, गरीबांचं राज्य आणू. आज भांडे घासणारी बाई मुलाला डॉक्टर करु इच्छित असेल तर ती सहा लाख रुपये कुठून आणणार याचं उत्तर मला द्या. तुमच्याकडे बुद्धी आहे, हुशारी आहे, पण पैसे नाहीत तर तुम्ही निवडणूक लढू शकत नाही. ज्यांच्याकडे बुद्धी नाही असेही लोक राजकारणात आले आहेत. मी कॉलेज बांधलं आहे, रुग्णालय बांधलं आहे. अंजुमन गर्ल्स हायस्कूल आम्ही मुंबईत मुलींसाठी सुरु केलं आहे. मी निवडणुकीत उभा राहणार नाही, माझ्या पक्षाचे उमेदवार लढतील आणि निवडून येतील. आज बरेच लोक बरीच आश्वासनं देतात. आज तर भाजपाही सांगते की आम्ही मुस्लिमांचे, अल्पसंख्याकांचे दुश्मन नाही. पण माझ्या मते भाजपा मुस्लिमांची शत्रू आहेच. बाबरी मशीद पडली त्याला भाजपा जबाबदार आहे, पण काँग्रेसही जबाबदार आहे. भारतात कायदा उरलेलाच नाही, कायद्याचा धाकही उरलेला नाही.