सांगली : अवघ्या चार मतांनी तांबट पक्षांवर मात करीत बांगलादेशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या दयाळने सांगली शहर पक्षीचा बहुमान पटकावला. ही निवड दहा वर्षांसाठी असून यानंतर गेल्या चार आठवड्यांपासून पक्षी निरीक्षकांनी निर्धारत केलेल्या पाच पक्षांसाठी मतदान घेण्यात आले होते. याचा निकाल रविवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला.
सांगलीत होत असलेल्या पक्षीमित्र संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहर पक्षी ठरविण्यासाठी मतदान घेण्यात आले. सप्टेंबरमधील सलग चार रविवारी ही निवडणूक झाली. मतपत्रिकेद्बारे मतदान नोंदणी करण्यात आली. शहर पक्षी पदासाठी तांबट, हळदी-कुंकू बदक, शिक्रा, दयाळ आणि धनेश हे पक्षी निवडणूक रिंगणात होते.




निवडणुकीमध्ये २ हजार १४० पक्षीप्रेमींनी आपले मत नोंदवले. यापैकी १३ मते अवैध ठरली. वैध मतांपैकी दयाळ या पक्षाला ५६१ तर तांबट या पक्षाला ५५७ मते मिळाली. यामुळे चार मतांनी दयाळ या सुरेल गळ्याच्या पक्षाची निवड झाल्याचे निवड समितीने जाहीर केले. उर्वरित उमेदवारांना मिळालेली मते अशी हळदी-कुंकू बदक २७५, शिक्रा ३७८ आणि धनेश ३५६.

हेही वाचा – अकोला : रक्षक बनला भक्षक; बंदुकीचा धाक दाखवत तरुणीवर…
दयाळ हा सांगलीचा शहर पक्षी म्हणून पुढील दहा वर्षे मिरवणार असून निवड समितीने निवडीचे पत्र आज महापालिका आयुक्त सुनील पवार यांना दिले. ही निवडणूक प्रक्रिया डॉ. नयना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शरद आपटे, डॉ. नंदिनी पाटील, श्रीकृष्ण कोरे व विश्वनाथ माडोळी या समितीच्या देखरेखीखाली पार पडली.