केतन अग्रवाल या तरुणाची सिया गोयलने हत्या केली असा आरोप तिच्यावर आहे. सिया आणि केतन यांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात झाला होता. मात्र केतनशी विवाह होणं तिला मान्य नव्हतं त्यामुळे सिया गोयलने तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीसह संगमनत केलं आणि केतनला लोहडगावरुन ढकलून देत त्याची हत्या केली असा आरोप या दोघांवर आहे. या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. विशेष बाब म्हणजे सिया आणि चेतन यांना अटक केल्यानंतर ते दोघंही एकमेकांवर आरोप करत आहेत असं पोलिसांनी म्हटलं आहे.

सिया आणि चेतन यांच्याबाबत पोलिसांनी काय सांगितलं?

केतन अग्रवालच्या हत्येचा कट मी नाही तर चेतनने रचला होता असं सिया गोयलचं म्हणणं आहे. तर चेतन अग्रवाल म्हणतो आहे की या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही सगळा कट सिया गोयलने रचला आहे. दोघंही केतनच्या हत्येची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. केतन अग्रवाल हा रिअल इस्टेट क्षेत्रातलं मोठं नाव असलेल्या विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचं लग्न सिया गोयलशी ठरलं होतं. मात्र सिया आणि चेतन यांनी कट रचून त्याला लोहगडावरुन ढकलून दिलं आणि हा अपघात आहे असं भासवलं. आता सिया आणि चेतन यांच्या चौकशीत काय समोर येतं आहे ते पोलिसांनी सांगितलं.

चेतन चौधरी आणि सिया यांचं म्हणणं नेमकं काय? पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतनने चौकशीच्या दरम्यान हे सांगितलं आहे की त्याने सियाला सांगितलं होतं की आपण दोघंही पळून जाऊ. पण तिने केतन अग्रवालच्या म्हणजेच तिच्या नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. दुसरीकडे सियाला चेतनचा हा आरोप मान्य नाही. सिया म्हणते आहे की केतनला लोहगडावरुन ढकलून द्यायचं हे चेतनने ठरवलं होतं. १४ जूनला जेव्हा लोहगडावरुन केतनला ढकलून देण्याचा प्रयत्न फसला तेव्हा चेतन रडला होता असंही पोलिसांना सियाने सांगितलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

Pune Crime News Lohagad Murder Case Police Investigation | पुणे ग्रामीण पोलीस लोहगड खून तपास | Pune Police crack Ketan Agarwal murder mystery | लोहगड किल्ला केतन अग्रवाल हत्याकांड आरोपी अटक
लोहगड किल्ला परिसरात झालेला केतन अग्रवालचा मृत्यू हा अपघात नसून थंड डोक्याने केलेला खून होता. (संग्रहित छायाचित्र)

चेतन आणि सिया दोघंही कांगावा करत आहेत याची आम्हाला पूर्ण कल्पना-पोलीस

दोघंही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत कारण त्यांना नेमकं कुणी केतनला ढकललं आहे हे सांगायचं नाही. त्यामुळे हा त्यांचा कावा आहे हे उघडपणे स्पष्ट होतं आहे. केतनच्या हत्येनंतर आणि हत्येपूर्वी ज्या घटना घडल्या त्या सगळ्या घटनांचा क्रम आमच्याकडे आहे. शिवाय जे पुरावे आम्हाला मिळाले आहेत त्यानुसार केतनला ढकलण्यात चेतन चौधरी आणि सिया गोयल या दोघांचाही हात आहे. चेतनने केतनला मारायचं ठरवलं होतं असा कांगावा सिया करते आहे. तर मी सियाला म्हटलं होतं की आपण पळून जाऊ पण तिनेच केतनला मारण्याचा कट आखला असा कांगावा चेतन चौधरी करतो आहे. आम्हाला हे ठाऊक आहे की या दोघांनीही नियोजन बद्ध पद्धतीने कट रचून केतनची हत्या केली आहे. ३१ मे, ४ जून या दोन्ही दिवशी चेतन आणि सिया एकमेकांना भेटले होते याचेही पुरावे आम्ही जमा केले आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की केतन त्याची मास्टर्सची डिग्री घेऊन बोस्टनहून भारतात आला होता. सिया गोयल आणि केतन यांची कुटुंबं एकमेकांना १९९० पासून ओळखतात. गुलबर्गा या ठिकाणी एका लग्नात केतन आणि सिया यांच्या कुटुंबीयांची भेट झाली आणि त्यांनी या दोघांचं लग्न ठरवलं अशी माहितीही आम्हाला मिळाली आहे.

सिया आणि चेतन यांच्या प्रेमसंबंधांबाबत पोलिसांनी काय सांगितलं?

सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे सियाला केतन अग्रवालशी लग्न करायचं नव्हतं. मात्र कुटुंबीयांनी या दोघांचा साखरपुडा एक बोलणी झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आटोपला आणि जयपूर येथील एका राजवाड्यात डिसेंबर महिन्यात या दोघांचं लग्न होणार होतं. १८ जूनला लोहगडावर सिया आणि केतन गेले होते. केतन सेल्फी घेताना पडला अशी माहिती सियाने केतनच्या कुटुंबाला फोन करुन दिली. पण कुटुंबाला सियाबाबत संशय आला. त्यामुळे सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणारी ही घटना हत्या आहे हे समोर आलं आणि पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीला अटक केली. पोलिसांनी जेव्हा लोहगडाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा चेतन हुडी घालून आला होता याचंही फुटेज पोलिसांना मिळालं. ज्यानंतर २३ जून रोजी या दोघांना पोलिसांनी अटक केली.