Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) आज २६ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी राज्यातील राजकारणासह विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर म्हणजे महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय कधी व का घेतला? याबाबत देखील अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं.

तसेच याच कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शिवसेना शिंदेंच्या काही नेत्यांना देखील अप्रत्यक्ष सुनावल्याचं पाहायला मिळालं. सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभागाचा निधी वळवल्याचा आरोप काही नेत्यांनी केला होता. त्यावर आज अजित पवार यांनी उत्तर देत थेट नाव न घेता मी खिशात पैसे घेऊन बसतो काय? असं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्ष सुनावलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“कधी कधी काही बातम्या येतात की अजित पवार पैसे सोडत नाहीत. पैसे सोडत नाही, मग मी काय खिशात पैसे घेऊन बसतोय का? शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत आम्ही २० टक्के पैसे सोडतो, दुसऱ्या तीन महिन्यांत ४० टक्के सोडतो. तिसऱ्या तीन महिन्यांत ६० टक्के सोडतो, नंतर ८० टक्के आणि शेवटी १०० टक्के सोडतो. अशा प्रकारचं ते नियोजन असतं. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं. तेव्हाच हे लक्षात आलं की अशाच पद्धतीने अनुसूचित जातीलाही दिलं पाहिजे. कारण आयोग होता पण वैधानिक दर्जा नव्हता. त्यानंतर आज राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला”, असं अजित पवार यांनी म्हटलं.

“समाजकल्याण विभागाचा निधी वळवल्याचा आरोप करण्यात येतो. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत त्या विभागाला जास्त निधी दिला आहे. काही जण मुद्दामहून आपलं सरकार आल्यापासून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जणांनी विधानं केले की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला. आता या ठिकाणी नरहळी झिरवाळ आहेत. तसेच सर्वांना माहिती आहे की या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना आदिवासी विभागाला आपण निधी वाढवून ४१ टक्के दिला आहे. पण ही माहिती सर्वांसमोर येत नाही”, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला? अजित पवारांनी सांगितलं कारण

“मला आजही १० जून १९९९ हा दिवस आठवतो. शरद पवार आणि इतर काही मान्यवरांनी एकत्र येत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत पक्षाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आपल्या पक्षाला कधीही बहुमत मिळालं नाही. आपल्याला नेहमीच सत्तेत सहभागी व्हावं लागलं. कारण आधीपासूनच राजकारणाची अशी परिस्थिती निर्माण झाली की एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. कारण केंद्रात देखील कुणाला यूपीए किंवा कोणाला एनडीए अशी आघाडी आणि युती करावी लागल्याची परिस्थिती देशाने पाहिली आहे. पण सर्वांनी साथ दिल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. आता काही जण मला विचारतात की तुम्ही भाजपाबरोबर का गेला आहात? मी तुम्हाला सांगतो की, २०१९ साली आपल्या पक्षाने शिवसेना पक्षाबरोबर सरकार स्थापन केलं होतं. तेव्हा देखील आपण सत्तेसाठी काही तडजोडी केल्या होत्या. कारण शेवटी विरोधी पक्षात बसून आणि घोषणा देऊन चालत नाही. आपण साधू संत नाहीत. आपण लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. त्यामधून आपण भाजपा आणि एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय घेतला”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.