Devendra Fadnavis On Ajit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाण्यात पार पडला. या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं. तसंच यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजीही केली. “अजित पवार यांनी आणि मी (देवेंद्र फडणवीस) जो रेकॉर्ड केला, तो रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

“अजित पवार यांनी बोलताना काही गोष्टी सांगितल्या. अजित पवार हे अर्थमंत्री आहेत, त्यामुळे अर्थमंत्र्यांचं कामच असतं की, कुठलीही फाईल आली की त्या फाईलवर असं काहीतरी लिहायचं की ती फाईल फिरून पुन्हा त्याच ठिकाणी गेली पाहिजे. त्यामुळे अजित पवारांनी बरोबर अर्थमंत्र्यांचं काम केलेलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : ‘मुख्यमंत्री करणार असं सांगितलं असतं तर संपूर्ण पार्टीच…’, अजित पवारांचं शिंदे-फडणवीसांसमोर मोठं विधान

“अजित पवार यांनी बोलताना सांगितलं की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच आमच्यामागे राहून गेले. मात्र, अजित पवारांनी आणि मी (देवेंद्र फडणवीस) जो रेकॉर्ड केला आहे, तो रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही. म्हणजे ७२ तासांचा आपला रेकॉर्ड तर आहेच. पण त्याही पेक्षा वेगळा रेकॉर्ड म्हणजे, मी असा मुख्यमंत्री झालो की, एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्रीही झालो, विरोधी पक्षनेताही झालो आणि उपमुख्यमंत्रीही झालो. अजित पवार हे देखील एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झाले, विरोधी पक्षनेतेही झाले आणि पुन्हा उपमुख्यमंत्री झाले”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं कौतुक केलं.

“राजकारणात अनेक रेकॉर्ड होत असतात. मात्र, मला असं वाटतं की जो रेकॉर्ड एकनाथ शिंदे यांनी केला तो रेकॉर्ड यापुढे तोडणं कठीण आहे. सत्ता पक्षामधून बाहेर पडायचं, विरोधी पक्षाबरोबर जायचं आणि मग सत्ता स्थापन करायची, अशा प्रकारची जी हिंमत त्यांनी दाखवली ही खऱ्या अर्थाने या पुस्तकाचा नायक त्यांना बनवते”, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

“माझ्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांची टर्म १९९९ साली सुरु झाली. एकनाथ शिंदे यांची टर्म २००४ साली सुरु झाली. या सर्वांमध्ये विधानसभेत सिनियर मी आहे. कारण मी १९९० च्या बॅचचा आहे. हे सर्व माझ्या नंतरच्या बॅचचे आहेत. पण हे सर्व माझ्या पुढे निघून गेले आणि मी मागे राहिलो. शेवटी ज्या-त्या गोष्टी ज्या-त्या वेळेस घडत असतात. मी गंमतीने काहींना म्हणालो की, तुम्ही ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांना सांगितलं की तुम्ही एवढे आमदार घेऊन आलात तर मुख्यमंत्री करणार, मग मला तसं सांगितलं असतं तर मी संपूर्ण पार्टीच आणली असती. शेवटी जे नशीबात असतं तेच होत असतं. आपण आपलं काम करत राहायचं”, असं अजित पवार यांनी म्हटलं.