DCM Devendra Fadnavis On Sachin Waze allegations : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. असे असतानाच आज (३ ऑगस्ट) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. “अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सीबीआयकडे पुरावे आहेत. याबाबत मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे, असा आरोप सचिन वाझेंनी (Sachin Waze) केला. या आरोपावर अनिल देशमुख यांनीही प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल असल्याचा आरोप केला. दरम्यान, सचिन वाझेंनी केलेल्या आरोपासंदर्भात आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे. “सध्या जे काही समोर येत आहे, त्यासंदर्भात आम्ही योग्य ती चौकशी करु”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“सचिन वाझेंनी केलेले आरोप मी माध्यमांमध्ये पाहिले आहेत. तसेच त्यांनी मला पत्र पाठवलं अशाही बातम्या आहेत. मात्र, मी ते काहीही पाहिलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मी नागपूरमध्ये आहे. असं काही पत्र आलंय का? कोणाकडे आलं आहे का? हे सर्व पाहिल्यानंतर मी त्यावर सविस्तर प्रतिक्रिया देईन. पण आता एवढं नक्की सांगतो की, जे काही समोर येत आहे, त्यासंदर्भात आम्ही योग्य ती चौकशी करु”, असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा : Anil Deshmukh : “देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल”, सचिन वाझेंच्या आरोपावर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

सचिन वाझेंनी देशमुखांवर काय आरोप केले?

“जे काही घडलं, त्याचे सर्व पुरावे आहेत. ते (अनिल देशमुख) त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याबाबत ‘सीबीआय’कडेही पुरावे आहेत. मी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) एक पत्र लिहिलं आहे. हे सर्व प्रकरण त्यांच्या (अनिल देशमुख) विरोधात गेलं आहे. तसेच मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. मी पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये जयंत पाटील यांचंही नाव आहे”, असा आरोप सचिन वाझे यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत केला.

अनिल देशमुख काय म्हणाले?

सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपावर अनिल देशमुख म्हणाले, “मी चार-पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते. जी वस्तुस्थिती मी समोर आणली होती. कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करुन द्यावं, यासाठी माझ्यासमोर जो प्रस्ताव आणला होता. ही गोष्ट ज्यावेळी मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. सचिन वाझेंनी माझ्यावर जे आरोप केले, ती देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे”, असा आरोप अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला.