लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची प्रचारसभा चंद्रपूरमध्ये पार पडली. यावेळी झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तसंच भाजपा चारशे पारचाही नारा दिला आहे. कुठल्याही उमेदवाराला निवडून देताना मोदींना निवडून देत आहात हे लक्षात ठेवा असंही आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आत्ताच सुधीर मुनगंटीवार म्हणाले की ही राज्याची निवडणूक नाही तर देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल? नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं हे ठरवणारी आहे. ही निवडणूक हे ठरवणार आहे की देशात मोदींचं राज्य आणायचं की राहुल गांधींना संधी द्यायची, हे ठरवणारी निवडणूक. सुधीरभाऊंना दिलेलं मत मोदींना दिलेलं मत आहे. तर काँग्रेसला दिलेलं प्रत्येक मत राहुल गांधींना दिलेलं मत आहे हा विचार करुन मत द्या असं आवाहन फडणवीस यांनी केलं.

राहुल गांधींची अवस्था काय?

राहुल गांधीनी जिथे यात्रा काढली तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला किंवा काँग्रेस पक्ष फुटला. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलं तर एकच नाव ऐकू येतं ते म्हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे असं नेतृत्व आहेत ज्यांनी गरीबांना घर दिलं, गरीब कल्याणाचा अजेंडा आणला. जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदींनी करुन दाखवलं. २५ कोटी गरीबांना दारिद्र्य रेषेबाहेर काढलं. मोदी सरकार हे मूठभर लोकांचं सरकार नाही. तर समाजातल्या प्रत्येक घटकाचं सरकार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात महायुती भक्कम झाली आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, रिपब्लिक पार्टी हे सगळे पक्ष आपल्याबरोबर आहेत. नेतृत्व, वक्तृत्व हे सगळे गुण त्यांच्यात आहेत. विरोधात असताना सत्ताधाऱ्यांना सळो की पळो केलं. सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न ५० कोटी वृक्ष लावून त्यांनी पूर्ण करुन दाखवलं. सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाच्या निमित्ताने त्यांची वाघनखं ब्रिटिशांनी नेली. ती वाघनखं दर्शनासाठी आणण्याचं काम सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला आहे. मोदींच्या नेतृत्वात, गडकरींच्या पुढाकाराने विदर्भाचा चेहराही बदलला आहे. प्रत्येकाची दुःखं समजू शकतो, समाजाला कोण समजून घेऊ शकतं? हा विचार चंद्रपूरमध्ये केला तर सुधीर मुनगंटीवार यांच्याशिवाय नाव येत नाही. चंद्रपूरच्या जनतेने निर्धार केला आहे की यावेळची जागा रेकॉर्ड मतांनी आपल्याला निवडून आणायची आहे. महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठून करायची तर ती चंद्रपूरपासून झाली पाहिजे असा ठराव आम्ही केला. अब की बार ४०० पार हा नाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.