Eknath Shinde On Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (१५ फेब्रुवारी) रत्नागिरीत जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला खोक्यात बंद करण्याचं काम केलं. ते म्हणायचे की कोण एकनाथ शिंदे, कोण रामदास कदम? पण आम्ही कोण आहोत हे त्यांना दाखवून दिलं. त्यामुळे दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“नारायण राणेंना सर्वात जास्त माहिती आहे की कुणाचे खोके कुठे आहेत? या महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना खोक्यात बंद करुन टाकलं. आता तरी खोके म्हणायचं बंद करा. पण रस्सी जळाली तरी रस्सीचा पीळ जात नाही. कोकणात शिवसेना वाढवण्यासाठी नारायण राणे आणि रामदास कदम यांनी त्या काळात खूप काम केलं. मी देखील नेहमी सांगायचो की जर पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्या, त्यांना वाढवा. मात्र, याबाबतचा अनुभव रामदास कदम यांनी घेतला. नारायण राणे यांनी देखील याचा अनुभव घेतला. शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपल्या पक्षात कोणीही मालक नाही. राजाचा मुलगा राजा नाही तर जो काम करेल तो राजा बनेल असा आपला पक्ष आहे”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

“आधी ते (ठाकरे) म्हणायचे की कोण एकनाथ शिंदे? कोण रामदास कदम? पण आम्ही कोण आहोत हे त्यांना दाखवून दिलं. आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करणारे आणि न्याय देणारे लोक आहोत. अडीच वर्षांपूर्वी या देशानेच नाही तर जगाने नोंद घेतली. आता राजन साळवी आपल्याकडे आले आहेत. पण त्यांनी खरं तर अडीच वर्षांपूर्वीच आपल्याकडे यायला पाहिजे होतं. पण आता ते आपल्याकडे आलेत. कोकणात एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेत का येत आहेत? ज्या पक्षाला विचारांची वाळवी लागली त्या पक्षात राजन साळवी तरी कसे राहतील? मग तेही आले शिवसेनेत”, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

“माझ्यावर आरोप करण्यापेक्षा आणि टीका करण्यापेक्षा हे लोक तुम्हाला का सोडत आहेत? याचा विचार करा, आत्मपरिक्षण करा. दाढीने तुम्हाला अगोदर कमाल दाखवली आहे. होती दाढी म्हणून उध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरु झाली विकासाची गाडी. त्यामुळे कशाला माझ्या नादाला लागता. मी आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही तर मी कामाने आरोपाला उत्तर देतो”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.

Story img Loader