DCM Eknath Shinde on Sanjay Raut Allegations over Varsha Bungalow : मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन दोन महिने लोटले तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्यापही शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. यावरून आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर याबाबत आरोप केला आहे. एकनाथ शिंदेंनी तिथे कामख्या मंदिरातून आणलेली रेड्याची शिंगे पुरली असल्याने देवेंद्र फडणवीस तिथे राहायला जात नसल्याचा दावा केला आहे. या चर्चांवर आता खुद्द एकनाथ शिंदे यांनीच प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले आहेत?

“मी असं ऐकलंय की फडणवीस म्हणाले, राहायला गेलो तरी मी वर्षावर झोपायला जाणार नाही. हा काय प्रकार आहे? आख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागली आहे. शिंदे गटातल्या या लिंबू सम्राटांनी त्याचं उत्तर द्यावं. भाजपाच्या अंत:स्थ गोटात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्य देवी मंदिरात कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंगं पुरली आहेत, जेणेकरून दुसऱ्या कुणाकडे मुख्यमंत्रीपद टिकू नये. अशी चर्चा आहे. त्यांचेच लोक सांगत आहेत. तिथला कर्मचारीवर्ग सांगतोय. हे खरं आहे की खोटं आहे माहिती नाही”, असा दावा राऊतांनी केला. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे. त्यांच्या प्रतिष्ठेचा तो मुद्दा आहे. नक्की तिथे काय घडलंय? कुणामुळे झालंय? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे? ते का अस्वस्थ आहे? हे महाराष्ट्राला समजायला हवं”, असंही संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया काय?

“संजय राऊतांना या क्षेत्रात अधिक अनुभव आहे. त्यामुळे याबाबत त्यांनाच खरं-खोटं विचारा. यावर बोलण्याची मला आवश्यकता वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आज ते माध्यमांशी बोलत होते.

Story img Loader