शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून ६ बंडखोर खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संबंधित खासदारांच्या मतदारसंघात जात सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या मुंबईतील मतदार संघात जाऊन सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप ईशान्य मुंबईची जागा मिंध्यांना सोडणार का? असं विधान केलं होतं. एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्यांनी उत्तर दिलंच शिवाय उद्धव ठाकरेंचं आव्हानही स्वीकारलं.
आज आपण सिक्सर मारला आहे-एकनाथ शिंदे
२०२२ ला चाळीस आमदार बरोबर आले होते आज आपण सिक्सर मारला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार वाचवण्यासाठी आपण तो उठाव केला होता. आता दुसरा टप्पा आहे. आपला उठाव बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. जिथे शिवसेनेचे विचार तिथे शिवसैनिक त्यामुळेच आज सहा खासदार बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत. आपली शिवसेना हे आपलं एक कुटुंब आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं उद्धव ठाकरेंचं आव्हान
उद्धव ठाकरेंनी जे विधान केलं त्याचा अर्थ असाच होता की, शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांना पुढील लोकसभेत उमेदवारी मिळणार नाही. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, ‘सहाचे सहा खासदार हे शिवसेनेच्या तिकीटावर उभे राहतील. धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढतील आणि निवडून येतील. आज हे सगळेजण शिवसेनेत सहभागी झाले आहेत. तुम्ही काय समजायचं ते समजून घ्या असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं आव्हान स्वीकारलं आहे.
मी गावाला गेलो की आजही काहींच्या पोटात दुखतं-शिंदे
आम्ही कुणालाही अडवायला नाही, तुडवायला नाही तर शिवसेना वाढवायला एकत्र आलो आहोत.आम्ही कुणाला अडवायला जात नाही, पण कुणी आडवं आलं तर बाळासाहेबांनीच सांगितलं आहे आला अंगावर तर घ्या शिंगावर. २०२२ चा उठाव आपण पाहिला आहे. एका विचारधारेसाठी आम्ही एकत्र आलो होतो. बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा सोडून दुसरा विचार आला तेव्हा आम्ही तो उठाव केला. तेव्हा अडीच वर्षे काय होतं आणि नंतरची अडीच वर्षे काय झालं ते आपण पाहिलं. आमचा निर्णय लोकांनी स्वीकारला. आम्ही लोकांमध्ये गेलो आणि महाराष्ट्राने उठावाचा निर्णय स्वीकारला असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ४० आमदारांपैकी कुणीही निवडून येणार नाही म्हटलं होतं. मी ते आव्हान स्वीकारलं होतं आणि म्हटलं होतं कुणीही हरलं तरी मी शेती करायला गावी निघून जाईन. आपले ६० आमदार आले, त्यानंतर मी गावी गेलो की काही लोकांना अजूनही पोटदुखी होते असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
