Sunetra Pawar Gaurdian Minister : राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना आणखी दोन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. सुनेत्रा पवार आता बीड आणि पुणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. हे दोन्ही जिल्हे अजित पवारांकडे होते. आता त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवारांकडे ही जबबादारी देण्यात आली आहे.
२८ जानेवारी रोजी अजित पवारांचं अपघाती निधन झालं. मुंबईहून बारामतीला येत असताना विमानाचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्यासह विमानात असलेल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एका फ्लाइट अंटेडंटचा समावेश आहे.
सुनेत्रा पवारांकडे तीन खाती
दरम्यान, अजित पवारांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली. तसंच, त्यांच्याकडे असलेली खातीही निराधार झाली. अजित पवार फक्त उपमुख्यमंत्री नव्हते, तर राज्यातील अनेक जबाबदाऱ्या सरकारने त्यांच्यावर सोपवल्या होत्या. त्यामुळे या जबाबदाऱ्या आता कोण सांभाळणार हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांचं उपमुख्यमंत्री पद त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडे देण्यात आलं. राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली आहेत. तर अजित पवारांचे नियोजन आणि वित्त हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे.
सुनेत्रा पवारांचे आव्हान वाढले
दरम्यान, अजित पवारांकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्याची जबाबदारी पहिल्यांदाच अजित पवारांकडे आली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा सर्वाधिक चर्चेत राहिला. त्यामुळे या जिल्ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र, अजित पवारांकडे या जिल्ह्याची जबाबदारी आल्यानंतर तिथे सकारात्मक बदल व्हायला सुरुवात झाली होती. परंतु, बीडचा कायापालट सुरू असतानाच अजित पवारांचं अकाली निधन झालं. त्यामुळे त्यांच्या पश्चात ही जबाबदारी आता सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहे. पुण्याचा विस्तार करण्याचे नियोजन आणि बीडमधील प्रलंबित प्रश्ने मार्गी लावण्याचं आव्हान आता सुनेत्रा पवारांसमोर असणार आहे.

