Supriya Sule on Gungi Gudiya Remark: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका करणारी एक पोस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आला होता. यावरून राज्यभर संतापाची लाट उसळली. काँग्रेसने आपलं विधान मागे घ्यावं, अशीही मागणी करण्यात आली. मात्र, महाराष्ट्र काँग्रेस आपल्या वक्तव्यावर ठाम होता. दरम्यान, आता यावर सुनेत्रा पवारांच्या वहिनी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी काँग्रेसचे आभार मानते
काल (८ ऑगस्ट) माध्यमांशी बोलताना त्यांना याबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुनेत्रा वहिनींनीबद्दल काँग्रेसने केलेलं वक्तव्य अयोग्यच होतं. मी स्वतः काँग्रेसच्या नेत्यांशी बोलले आहे. मी काँग्रेसच्या नेतृत्त्वाचे आभार मानते. कारण, मी काँग्रेसशी बोलल्यानंतर अर्ध्या तासात काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट केली.”
“काँग्रेसची जी महाराष्ट्रातील स्थानिक सोशल मिडिया टीम आहे, त्यांच्याकडून हे वक्तव्य झालेलं आहे. हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं मत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि देशातील काँग्रेस यांच्यात वेगळी मतं आहे. केंद्रातील काँग्रेस पक्षाने स्पष्ट भूमिका केली आहे की, कोणत्याही महिलेबद्दल किंवा कोणाही व्यक्तीबद्दल अशी टीका का करावी. टीका करायला मराठी भाषेत खूप ताकद आहे”, असंही त्या म्हणाल्या.
“टीका करायची असेल तर अनेक शब्दांनी टीका केली जाते, पण कोणाचाही अपमान होईल, अशी टीका करू नये, असं आमचं मत आहे. कोणत्याही व्यक्तीबद्दल टोकाची भूमिका घेणं हे मराठी संस्कृतीला न शोभणारं आहे. माझी काँग्रेसला विनंती आहे की जे झालं ते सोडून देऊया. केंद्रातील काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवून निर्णय घेतला आहे”, असंही त्या पुढे म्हणाल्या.
नेमकं प्रकरण काय?
सुनेत्रा पवारांना बीडमधील कायदा-सुव्यवस्थेबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला होता. मात्र, या प्रश्नावर धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला रोखलं. सुनेत्रा पवारांना बोलू दिलं नाही. हाच व्हिडिओ महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना “सुनेत्रा पवार, अजून किती दिवस “गुंगी गुडिया” बनून राहतील?” असा प्रश्नही महाराष्ट्र काँग्रेसने विचारला.
या पोस्टवरून प्रचंड गदारोळ झाला. यावरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया दिली. मात्र, हा व्हिडिओ आणि पोस्ट अद्यापही महाराष्ट्र काँग्रेसच्या खात्यावरून हटवण्यात आलेली नाही.
