Sunetra Pawar Meet Vidhip Jadhav Wife : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. बारामती येथे विमान लँडिंग होत असताना अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे अजित पवारांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली. तर, “विदीप जाधव यांना शहीदाचा दर्जा मिळावा”, अशी मागणी विदीप जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं, असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.
स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे, असा धीर देत त्यांनी कुटुंबीयांना आधार दिला. या भावस्पर्शी भेटीमुळे परिसरात उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. कर्तव्यपथावर असतानाही अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला, असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
माझं आणि त्यांचं दुःख सारखंच
तसंच, “माझे पती शेवटपर्यंत दादांबरोबर होते. त्यांनी दादांना कधीच अंतर दिलं नाही. त्याचप्रमाणे वहिनीही माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहेत. माझ्या मुलांकडे आणि संपूर्ण कुटुंबियांकडे त्यांचं लक्ष कायम राहील. त्यांचं आणि आमचं नातं घरच्यासारखं आहेत, असं त्या म्हणाल्या”, अशी प्रतिक्रिया विदीप जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव यांनी दिली. तर, “सुनेत्रा पवारांचं दुःख आणि माझं दुःख एकसारखं आहे, तरीही त्या उभ्या आहेत, त्यांनी माझ्यावर आणि घरावर हात ठेवला आहे, हे मी विसरू शकत नाही”, असंही त्या कृतज्ञतापूर्वक म्हणाल्या.
माझा एकूलता एक मुलगा गेला
“माझ्यासाठी हा मोठा धक्का आहे. परमेश्वराच्या कृपेने सावरण्याचा प्रयत्न करतोय. मुलाच्या अपेक्षा खूप होत्या. तशा पूर्ण झाल्या नाहीत. कारण तो अर्धवट सोडून गेला. तो एकुलता एक मुलगा आहे. २६ जानेवारीला प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलण झालं होतं”, अशी प्रतिक्रिया विदीप जाधव यांच्या वडिलांनी दिली.
विदीप जाधवांना शहिदाचा दर्जा मिळावा
“दादांबरोबरच ते शहीद झाले. त्यामुळे विदीप जाधव यांना शहिदाचा दर्जा मिळावा. शहिदाच्या कुटुंबाला जी सवलत मिळते ती त्यांना मिळावी”, अशी मागणीही संध्या जाधव यांनी केली.

