नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. स्वयंघोषित अशोक खरात हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचा अध्यात्मिक मार्गदर्शक होता. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना अशोक खरात याच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. अशोक खरातला त्यांनी गुरु मानलं होतं. आता याच रुपाली चाकणकर यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद आहे. मात्र, आता या पदावरुनही रुपाली चाकणकर यांची उचलबांगडी होण्याची दाट शक्यता आहे.

रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्षपदही सोडावं लागणार?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे कारण आणि इतर तपशील अद्याप समोर आला नसला तरी या बैठकीत अशोक खरात प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची बैठक झाली होती. या बैठकीत रुपाली चाकणकर यांच्या अशोक खरातशी असलेल्या संबंधांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होणारी बदनामी कशी थांबवायची, याबाबत तिन्ही नेत्यांची चर्चा झाली होती. या बैठकीतून रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना दिल्याचीही कुजबुज राजकीय वर्तुळात होती. या बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी, ‘कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही’, असे सूचक वक्तव्य केले होते. तेव्हापासूनच रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी होईल, अशी चर्चा रंगली आहे.

रुपााली चाकणकर यांना सोडावं लागलं महिला आयोगाचं अध्यक्षपद

१) भोंदू अशोक खरातसह रुपाली चाकणकर यांचे फोटो प्रसिद्ध झाले. या फोटोंमध्ये रुपाली चाकणकर अशोक खरातची पाद्यपूजा करताना दिसल्या. ज्यानंतर बराच गदारोळ झाला.

२) रुपाली चाकणकर यांनी अघोरी पूजा केली आणि त्यासाठी अनामिका कापून घेतली होती असे आरोप त्यांच्यावर सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केले होते.

३) रुपाली चाकणकर यांना अशोक खरात काय करतो? महिलांचं शोषण कसं करतो हे सगळं माहीत होतं तरीही त्या गप्प राहिल्या आणि संवैधानिक पदाचा गैरवापर केला असा आरोप त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला. तसंच रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना हा आयोग अशोक खरातच चालवत होता असंही त्या म्हणाल्या.

४) आरोपांच्या या सगळ्या फैरी झाडल्या गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना पद सोडण्याचे आदेश दिले. ज्यानंतर रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला.