वडिलांच्या मृत्यूमुळे आपल्यालाही क्वारंटाईन करतील या भीतीने विरारमधील दोन बहिणींनी धक्कादायक कृत्य केलं. वडिलांचा मृतदेह तब्बल चार दिवस घरात दडवून ठेवला. मात्र नैराश्य आल्याने मंगळवारी एका बहिणीने आत्महत्या केली. ते पाहून दुसऱ्या बहिणीनेदेखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला वाचविण्यात पोलिसांना यश आले.

विरार पश्चिमेच्या अग्रवाल येथील गोकूळ टाऊनशिपमध्ये ब्रोकलीन अपार्टमेंटमध्ये हरिदास सहरकर (७२) हे पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. ते सरकारी नोकरीतुन निवृत्त झाले होते. त्याना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावर घर चालत होते. त्यांना विद्या ( ४०) आणि स्वप्नाली (३६) या दोन अविवाहित मुली होत्या. १ ऑगस्ट रोजी हरिदास यांचे निधन झाले. मात्र वडिलांचे निधन हे करोनामुळे झाले असे मुलींना वाटले. हे जर समजले तर सर्वाना क्वारंटाईन करतील अशी भीती मुलींना वाटली. यामुळे त्यांनी वडिलांचा मृतदेह घरत दडवून ठेवला होता.

मंगळवारी विद्या हिने नवापूर समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. तिची ओळख पटली नव्हती. बुधवारी सकाळी लहान बहिण स्वप्नाली हिनेदेखील याच समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रभात फेरीसाठी आलेले नागरिक आणि स्थानिक पोलिसांनी तिला वाचवले. तिच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला.

“त्यांच्या वडिलांचा १ ऑगस्टला मृत्यू झाला होता. करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास आपल्याला क्वारंटाइन करतील अशी त्यांना भीती होती. यामुळे त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली नव्हती. तो मृतदेहदेखील ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवत आहोत,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. हरिदास हे रेशनिंग ऑफिसर म्हणून ते काम करत होते. निवृत्त झाल्यानंतर घरात ते एकमेव कमावणारे होते. त्यामुळे यामागे कौटुंबिक तसंच आर्थिक कारणदेखील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.