Premium

“नांदेड रुग्णालयातील मृत्यू औषधांच्या तुटवड्यामुळे नाहीत”, अधिष्ठातांनी दिली माहिती; मृत्यूमागचं सांगितलं कारण

अवघ्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला.

24 Deaths in Nanded Maharashtra Government Hospital
२४ तासात नांदेड रुग्णालयातील मृत्यू (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shankarrao Chavan Government Hospital Nanded Deaths : महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात मागील २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. अवघ्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. याप्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय मनुरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> २४ तासांत २४ जणांचा मृत्यू; नांदेडच्या सरकारी रुग्णालयातील खळबळजनक प्रकार

विष्णुपुरी परिसरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आहे. रुग्णालयात गेल्या २४ तासांत ६ मुले व ६ मुली या १२ बालकांसह सात स्त्रिया आणि पाच पुरुष दगावले आहेत. मृतांमध्ये सर्पदंश, विषप्राशन तसेच अन्य आजारांचेही रुग्ण होते. यातील काही जण परराज्यातील असल्याचे सांगण्यात आलं.

वैद्यकीय अधिक्षकांनी काय दिली माहिती?

“गंभीर व्याधींमुळे मृत्यू झाले आहेत. डॉक्टरांनी त्यांना २४ तास सेवा दिलेली आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता झालेली नाही. त्यांना असलेले आजार असे होते की ते वाचू शकले नाही. रोज १० ते १६ रुग्ण गंभीर आजार असलेले रुग्ण रुग्णालयात येतात आणि त्यांचा मृत्यू होतो. यामध्ये निष्काळजीपणा, औषधांचा तुटवडा अजिबात नाही. सर्व रुग्णांवर शर्थीचे प्रयत्न केले जातात. पण त्यांना गंभीर आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाला. गंभीर अवस्थेत रुग्ण रुग्णालयात येतात, त्यांच्यावर शर्थीचे प्रयत्न केले जातात. आपल्याकडे अत्यावश्यक रुग्णांसाठी जे औषधे असतात ते लोकल स्तरावर खरेदी केली जातात”, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्यामराव वाकोडे यांनी दिली.

हेही वाचा >> नांदेडमधील शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू, विरोधकांचं सरकारवर टीकास्र; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

१२ बालकांच्या मृत्यूंचं कारण काय?

“हिंगोली, परभणी, यवतमाळ, पुसद, उमरखेड, तेलंगणातील काही गावातील अतिगंभीर रुग्ण या रुग्णालयात येत असतात. ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात २४ मृत्यू झाले आहेत. यामध्ये १२ नवजात बालके आहेत. एक ते दोन दिवसांचे ती बालके होती. मुदतपूर्व प्रसुती झाल्यामुळे त्यांचं वजन जास्त नव्हतं.तर एक बाळावर शस्त्रक्रिया झालेली होती. या कारणांमुळे १२ बालकांचा मृत्यू झाला आहे”, अशी माहिती वाकोडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

विरोधकांचं टिकास्र

या घटनेबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “रुग्णालयाच्या अधिष्ठांशी चर्चा केली आहे. परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे. वैद्यकीय महाविद्यालय असल्यानं शासनानं तातडीनं कारवाई आणि मदत करण्याची आवश्यकता आहे.”

“आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत अयशस्वी ठरत आहेत. सावंत यांच्या हातात महाराष्ट्राचे आरोग्य दिले, तर ही धोक्याची घंटा आहे. हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेत फेरबदल करावे”, असे म्हणत शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंतांना हटवण्याची मागणी केली.

“ठाण्यातील महापालिका रुग्णालयात झालेल्या मृत्यूनंतर अन्य ठिकाणीही या घटना घडत आहे. कारण, हाफकिनकडून औषधांची खरेदी करण्यात आलेली नाही. अनेक वैद्यकीय आणि सरकारी रुग्णालयांत लोकांचा मृत्यू होत आहे. या मृत्यूंना सरकार जबाबदार आहे,” असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Death in nanded hospital not due to shortage of drugs informs officials state the cause of death sgk

First published on: 03-10-2023 at 08:16 IST
Next Story
Maharashtra Hospital Death : नांदेडमधील शासकीय रूग्णालयात २४ तासांत २४ रूग्णांचा मृत्यू, विरोधकांचं सरकारवर टीकास्र; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…