वसमत तालुक्यातील मरसूळवाडी शिवारात गेल्या २ नोव्हेंबरच्या पहाटे बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात विठ्ठल गोिवद कऱ्हाळे जखमी झाले. शिवारात बिबटय़ा आल्याचे ग्रामस्थांनी वन विभागाला कळवले, मात्र बिबटय़ा नसून तरस असू शकते, असे सांगून वन विभागाच्या अधिकाऱ्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. अखेर रविवारी (दि. ९) सीताराम साबळे यांच्या शेतात मृतावस्थेत बिबटय़ा आढळून येताच खळबळ उडाली.
दरम्यान, मृत बिबटय़ाचे नमुने अधिक तपासणीसाठी औरंगाबाद व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच बिबटय़ाच्या मृत्यूमागील कारणांचा उलगडा होऊ शकेल, असे वन विभागातून सांगण्यात आले. नर जातीचा व ४ वर्षांचा हा बिबटय़ा होता.
वसमत तालुक्यातील मरसूळवाडी येथील काही भजनी मंडळी गेल्या शनिवारी (२ नोव्हेंबर) गावानजीक रेवणसिंगतांडा येथे भजने म्हणण्यासाठी गेली होती. भजनाचा कार्यक्रम आटोपून रविवारी पहाटेस गावाकडे परतत असताना विठ्ठल गोिवद कऱ्हाळे (वय ५५) यांच्यावर समोरून बिबटय़ाने झेप घेतली. सोबतच्या लोकांनी आरडाओरड केल्याने बिबटय़ा पळाला. जखमी कऱ्हाळे यांना सुरुवातीला उपचारासाठी वसमत उपजिल्हा रुग्णालयात व नंतर नांदेडला हलवले.
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. लोकांनी शिवारात बिबटय़ा असल्याचे वन विभागाला कळवले, मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून या भागात बिबटय़ा कसा आला, असा प्रश्न करून हा प्राणी तरस असल्याचे सांगून लोकांची समजूत काढली. मात्र, अधिकाऱ्यांनी लोकांच्या माहितीवर विश्वास ठेवलाच नाही, उलट हा प्राणी तरसच असल्याचे सांगून दुर्लक्ष केले. रविवारी सकाळी मरसूळवाडी शिवारात सीताराम साबळे यांच्या शेतातील झाडाखाली बिबटय़ा बसलेला असल्याचे लोकांनी वन विभागाला कळवले. या वेळी शिवारात बिबटय़ाला पाहण्यास लोकांची गर्दी होऊ लागली. वन अधिकारी िपजरा घेऊन शिवारात पोहोचले व सायंकाळी बिबटय़ाला पकडण्यासाठी िपजरा लावला.
अधिकाऱ्यांनी िपजऱ्यात करडू ठेवले. रात्री उशिरापर्यंत करडू ओरडत होते, मात्र बिबटय़ा िपजऱ्यात आलाच नाही. सोमवारी वन कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला. बिबटय़ाचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल, असे वन अधिकारी डी. बी. देवरे यांनी सांगितले.
मरसूळवाडी येथील विठ्ठल कऱ्हाळे यांच्यावर मागील रविवारी (२ नोव्हेंबर) बिबटय़ाने समोरून झेप घेऊन जखमी केले. त्यांच्यावर नांदेड रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकाराची माहिती वन विभागाला दिली असता बिबटय़ा नव्हे, तो प्राणी तरसच असल्याचे सांगून वन अधिकाऱ्यांनी सुरुवातीला साफ दुर्लक्ष केले होते. वन विभागाने वेळीच शोध घेतला असता, तर बिबटय़ा मृतावस्थेत का सापडला, हे पाहण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली.