चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयातील कोविड-१९ सेंटरमध्ये शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता कोविड योध्दा डॉ. सुनील टेकाम (३२) यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आज दिवसभरात ६० करोनाबाधितांचीन नोंद झाली आहे.

मूळचे राजुरा येथील रहिवासी असलेले डॉ.सुनील टेकाम वरोरा ग्रामीण रूग्णालयात केंद्र सरकारच्या आयुष्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत होते. करोना संक्रमणाच्या काळात त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली. मात्र ६ ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांची करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर वरोरा येथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अधिक खालावल्याने डॉ.टेकाम यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयातील कोविड सेंटर येथे ११ ऑगस्ट रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्याच्यावर तेथे उपचार सुरू होते. दरम्यान आज सकाळी त्यांची प्रकृती अधिक खालावली व सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचेशी संपर्क साधला असता, करोनाची लागण झाल्यामुळे डॉ.सुनील टेकाम यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना मधुमेह होता, त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली असेही ते म्हणाले. दरम्यान डॉ.सुनील टेकाम यांना मरनोपरात्न करोना योध्दा सन्मान जाहीर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी गुल्हाने व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांचे हस्ते टेकाम कुटुंबाला हा सन्मान देण्यात आला. डॉ. सुनील टेकाम यांच्या पश्चात पत्नी, दिड वर्षांचा मुलगा व परिवार आहे.

जिल्ह्यात आज करोनाचे एकूण ६० नवे रूग्ण आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १ हजार ३०६ झाली आहे. यातील ९५५ बाधित उपचारांती बरे झाले तर ३५१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३ मृत्यू झाले असून त्यातील ११ जिल्ह्यातील व २ बाहेर जिल्ह्यातील आहेत.