परभणीतील घटना; तीन आरोपींना अटक

परभणी : सामूहिक अत्याचार झाल्यानंतर अल्पवयीन मुलीने विष प्राशन केले. सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेतील पीडितेचा सोमवारी सायंकाळी उपचारांदरम्यान, लातूर येथे मृत्यू झाला.

सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा येथील घटनेप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी यापूर्वी दोन अल्पवयीन मुलांना तर ज्ञानेश्वर शिंदे या तिसऱ्या आरोपीला सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

डिघोळ तांडा येथे १२ सप्टेंबरला हा प्रकार घडला होता. पीडित मुलीने १४ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. तिला अधिक उपचारांसाठी अंबाजोगाई येथे दाखल केले होते. तिची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी लातूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान तिचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला.

 या प्रकरणी पीडितेच्या नातेवाइकांनी सोमवारी सायंकाळी सोनपेठ पोलिसांत तक्रार दाखल केली.