लोकसत्ता प्रतिनिधी सोलापूर : रुग्णांवर उपचार करतानाचा हलगर्जीपणाच्या दोन घटना उघड झाल्या असून यामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एका घटनेत व्यसनमुक्तीचा उपचार करताना रुग्णाचे दोन्ही हात-पाय पलंगाला अनेक तास बांधून नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि औषधोपचारासह जेवण-पाणी न देण्याचा क्रूर प्रकारही समोर आला. या दोन्ही घटनांबाबत संबंधित डॉक्टरांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत. सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील माहितीनुसार, विजापूर नाका गरिबी हटाव झोपडपट्टी क्रमांक दोन भागातील मीरा हॉस्पिटलमध्ये दारूच्या व्यसनावर उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या प्रवीण अमृत करंडे (वय २७, रा. ओमकार नगर, भवानी पेठ, सोलापूर) या रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल तेथील डॉ. हर्षल थडसरे (वय ३६) व परिचारिका अनिता हादिमनी (वय ३३) यांच्यासह त्यांचा सहायक आशिष जाधव (वय २८) आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला अन्य रुग्ण संतोष हादिमनी (वय ४२) यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. आणखी वाचा-लाडकी बहीण’चा गैरफायदा घेणाऱ्या दाम्पत्यास अटक मृत प्रवीण करंडे यास दारूचे व्यसन होते. व्यसनमुक्तीच्या उपचारासाठी त्यास मीरा हॉस्पिटलमध्ये गेल्या २ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्यास बेशुद्धावस्थेत छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद सलगर वस्ती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून झाली होती. पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या. उपचाराच्या नावाखाली प्रवीणचे दोन्ही हात-पाय लोखंडी पलंगास सलग आठ तास बांधून ठेवण्यात आले होते. या दरम्यान त्याला औषधासह नाश्ता, जेवण, पाणीही देण्यात आले नव्हते, की त्यास नैसर्गिक विधीसाठी सोडण्यात आले नव्हते. शेवटी प्रवीण याने स्वतः एक हात आणि एक पाय सोडवून घेतला. पण तो पलंगावरून जमिनीवर पडला. या वेळी त्याचा दुसरा हात आणि पाय पलंगाला बांधलेल्या अवस्थेतच होते. त्याच अवस्थेत तो बराच वेळ पडला होता. परंतु त्याच्याकडे पाहायला कोणीही आले नाही. अखेर शेजारच्या रुग्णाने ही गोष्ट परिचारिका अनिता हादिमनी यांच्या निदर्शनास आणून दिली असता, या वेळी त्याची प्रकृती गंभीर झाल्याचे लक्षात आल्याने प्रवीणला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मीरा हॉस्पिटल मधील संपूर्ण घटनाक्रम तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. शासकीय रुग्णालयात उपचारापूर्वीच प्रवीणचा मृत्यू झाला होता. मृतदेहाची न्यायवैद्यक तपासणी केल्यानंतर त्यात मृताच्या शरीरावर आढळून आलेल्या जखमा टणक आणि बोथट हत्याराने झाल्याचा अभिप्राय देण्यात आला. तसेच मृताला जास्त प्रमाणात सीपीआर दिल्याचेही निष्पन्न झाले. आणखी वाचा-सांगली: चांदोली धरण परिसरास भूकंपाचा सौम्य धक्का याबाबत विचारणा केली असता, डॉ. थडसरे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. घटनेची चौकशी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या अधिपत्याखालील समितीने केली. या समितीने दिलेल्या अहवालानुसार, प्रवीण करंडे याचा मृत्यू डॉ. हर्षल थडसरे, परिचारिका अनिता हादिमनी आणि इतरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानुसार सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी फिर्याद नोंदविली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना हैदराबाद रस्त्यावरील इंदिरा गांधी विडी घरकूल परिसरात घडली. या प्रकरणात डॉ. शैलेश माने व डॉ. कोमल माने यांच्याविरुद्ध तीन वर्षांनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. जुलै २०२१ मध्ये अशोक विठ्ठल पल्ली (वय ४६, रा. योगेश्वरनगर, विडी घरकूल) हा रुग्ण हाताला सूज आल्यामुळे डॉ. माने दाम्पत्याच्या संकल्प क्लिनिकमध्ये बाह्य उपचारासाठी गेला होता. परंतु तज्ज्ञ डॉक्टरांकडे न पाठविता त्याच्यावर जुजबी उपचार केल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर होऊन तो मृत्यू पावला. या घटनेची चौकशी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने केली. समितीच्या अहवालात डॉ. माने दाम्पत्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे यांनी डॉ. शैलेश माने व डॉ. कोमल माने यांच्याविरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे.