बीडमध्ये रात्रीच्या जेवणानंतर अचानक उलटी, मळमळ होऊ लागल्याने चौघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन बहिणींसह ८ महिन्याच्या भावाचाही मृत्यू झाल्याची घटना बागझरी (ता. अंबाजोगाई) येथे शनिवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी घडली. आईची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा नेमकी कशातून झाली? हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत. बागझरी येथील काशीनाथ दत्तू धारासुरे यांच्या दोन मुलींसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. घरात शिल्लक राहिलेले रात्रीचे जेवण केल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. साधना काशीनाथ धारासुरे (वय ६), श्रावणी धारासुरे (वय ४) या दोघींचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. तिन्ही भावंडांचा मृत्यू, आईची मृत्युशी झुंज सुरू आई भाग्यश्री धारासुरे आणि आठ महिन्याचा नारायण धारासुरे या दोघांवर उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी आठ महिन्याच्या नारायणचाही मृत्यू झाला. तिन्ही भावंडांचा मृत्यू झाला असून आईची मृत्युशी झुंज सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. बागझरी येथे विषबाधा झाल्याचे कळताच आमदार संजय दौंड यांनी तातडीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात जाऊन रुग्णासह नातेवाईकांची भेट घेतली. हेही वाचा : बीडमध्ये परळीत बहिण-भावाची हत्या, तर माजलगावमध्ये शिक्षकासह तिघांची आत्महत्या शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार विषबाधा नेमकी कशामुळे झाली? याचा तपास पोलीस करत असून शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घडलेला प्रकार घातपाताचा तर नाही ना? असा संशयही व्यक्त होऊ लागला आहे.