scorecardresearch

सोलापुरात शाळा सुरू करण्याचा निर्णय येत्या आठवडय़ात

सोलापूर जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्वच विभागांनी कामात सातत्य ठेवावे, कोणत्याही बाबतीत हयगय करू नका.

पालकमंत्री भरणेंच्या सूचना

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्वच विभागांनी कामात सातत्य ठेवावे, कोणत्याही बाबतीत हयगय करू नका. रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय आठवडय़ात घेण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. नियोजन भवन येथे मंगळवारी आयोजित करोनाविषयक आढावा बैठकीत भरणे बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आदी उपस्थित होते.

शहर व जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. पंढरपूर, माळशिरस, बार्शी, करमाळा, माढा या पाच तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांची लक्षणे सौम्य असली, तरी प्रत्येकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही भरणे दिल्या. जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळू लागली आहे. प्रशासनाने यंत्रणेशी सतत संपर्कात राहून लस उपलब्ध करून घ्यावी. १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना कोवॅक्सिन मात्रा दिली जाते. दोन लाख २६ हजार ४१२ मुलांपैकी केवळ ६९ हजार ६७९ जणांना देण्यात आला आहे. या डोसची मागणी वेळेत नोंदवून उपलब्ध करून घ्यावे. पहिली मात्रा २९ लाख ८६ हजार ६६५ नागरिकांना दिली असून ८५.४ टक्के लसीकरण झाले आहे. दुसरी मात्रा डोस १८ लाख ९४ हजार ५५३ नागरिकांनी घेतली असून याची टक्केवारी ५५.५ टक्के झाली आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी दिल्या. करोनाची तिसरी लाट सुरू असून सध्या सोलापुरात करोना रुग्णांचे प्रमाण २६ टक्के आहे. तिसऱ्या लाटेची तयारी पूर्ण झाली आहे. २८ हजार ४०० खाटांची क्षमता वाढविण्यात आली असून औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्राणवायूची तीनपट क्षमता वाढविल्याने कमतरता नसल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Decision start school next week ysh

ताज्या बातम्या