राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी एनडीएने दलित समाजातील व्यक्तीच्या नावाला पसंती देण्याच्या निर्णय क्रांतीकारी असल्याचे सांगत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी संदर्भात घेतलेल्या या निर्णयामुळे सरकार दलित विरोधक असल्याचा प्रचार करणाऱ्यांची तोंडे बंद होतील, असे ते म्हणाले.

एनडीएच्यावतीने सोमवारी राष्ट्रपतीपदाची उमेदवार जाहीर करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारचे विद्यमान राज्यपाल रामनाथ कोविंद हे एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले. या निर्णयावर आठवले म्हणाले की, सरकार दलित विरोधी असल्याचा प्रचार करणाऱ्यांची तोंडे बंद करण्याचे काम पंतप्रधान नरेद्र मोदी आणि अमित शहा यांनी या निर्णयातून  केले आहे. एनडीएने आतापर्यंत अनेक चांगले निर्णय घेतले असून हा निर्णय आजपर्यंतचा क्रांतिकारी निर्णय आहे.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने तीन वर्षाच्या काळात सर्व सामान्यांच्यादृष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत. त्यातील हा निर्णय फारच महत्त्वपूर्ण असा आहे. सरकारने दलित समाजातील व्यक्तीला राष्ट्रपतीपदासाठी संधी दिली. या निर्णयामुळे दलित समाजात आनंदाचे वातावरण असून एनडीएचा उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्व पक्षांशी चर्चा करण्यात येईल. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता शिवसेनापक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून ते देखील उमेदवारास पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दलित व्यक्ती उच्च पदावर जात असून यात विरोधकांनी आडकाठी आणू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.