राहाता : महिला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या ईशान्येश्वर मंदिरात मी आता कधीही जाणार नाही. ईशान्येश्वर मंदिराच्या विश्वस्तांची देखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली. जवळजवळ ३९ आमदार खरातला भेटून गेले, मग मलाच का लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न केसरकर यांनी उपस्थित केला.
श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने माजीमंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना केसरकर म्हणाले, भोंदू खरातच्या दुष्कृत्याबाबत माहित नव्हते, मी धार्मिक असल्याने त्या मंदिरात गेलो. खरातने मंदिराच्या आडून केलेल कृत्य निंदनीय आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि मी मंत्री असताना त्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. त्यांनाही या भोंदूची कल्पना नव्हती.
मी देवभक्त आहे. मी न चुकता शिर्डीला येतो. शिर्डीला येण्याच्या वाटेवर ईशान्येश्वर मंदिर आहे. मी लहान असल्यापासून दर सोमवारी शिव मंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर कुठल्या शिव मंदिरात जायचे? तर मग मी ईशान्येश्वर मंदिरात जाणे झाले. त्या निमित्ताने खरातशी ओळख झाली. त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग नाही. त्याला वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल, तर मी दोषी आहे. पण त्याच्याकडून जे चुकीचं कृत्य घडलेलं आहे, त्याची शिक्षा त्याला झाली पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. खरातने ज्योतिष शास्त्र बदनाम केले आहे, असेही स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले.
माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र रचले जात आहे. संजय राऊत काहीही बोलतात, त्यांना देखील परिवार आहे. संजय राऊत ठाकरेंचे प्रवक्ते आणि मधील काळात मी शिवसेना शिंदे गटाचा प्रवक्ता होतो. त्याचा कदाचित ते सूड उगवत विधाने करीत असल्याचा आरोप केसरकर यांनी राऊत यांच्यावर केला.
भोंदू खरातमुळे अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिमा मलिन होत आहेत. ३९ नेत्यांचे खरातबरोबर छायाचित्र आहेत, पण संजय राऊत मलाच का टारगेट करीत आहेत, असा प्रश्न केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला. ईशान्येश्वर ट्रस्टच्या विश्वस्तांची ‘एसआयटी’कडून चौकशी व्हावी व भोंदू खरातला कठोरात कठोर शिक्षा होऊन पिडीतांना न्याय मिळायला हवा, अशी अपेक्षा केसरकर यांनी व्यक्त केली.
अशोक खरात या भोंदूबाबत जराही कल्पना कशी आली नाही? याबद्दल विचारले असता केसरकर म्हणाले की, तेच दुर्दैव आहे, की मी मंत्री असताना देखील तेथे येत होतो. त्यावेळी माझ्या बरोबर पोलीस असत, पोलिसांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती, नाही तर त्यांनी मला सांगितले असते किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या काही भक्तांमध्ये अनेक शिक्षक होते, ज्यांच्यासाठी मी खूप काम केले आहे. ते नेहमी आम्हाला सांगायचे की, तुम्ही शिक्षकांसाठी जेवढं काम केले तेवढे कुठल्याच शिक्षण मंत्र्यांनी केले नाही. मग त्यांना जर या गोष्टीची कल्पना असती तर त्यांनी आम्हाला सावध केले असते, असे केसरकर म्हणाले.
खरातच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल आम्हाला कोणालाच काही माहिती नाही. ईशान्येश्वराच्या भक्तीपोटी त्यांची ओळख झाली. ओळख झाल्याचा जर छायाचित्र निघाले तर त्याबद्दल काहीतरी बोलणे चुकीचे आहे. ऑफिसमध्ये जायचे की नाही हे देखील ते मला खरात सांगायचे. हे खूप चुकीचे आहे. श्रद्धा असते पण अंधश्रद्धा कधीही नसते असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
माझ्या खात्याशी त्याचा काहीही संबंध नाही. फक्त ईशान्येश्वर मंदिराच्या संदर्भात त्याची ओळख झाली आणि ईशान्येश्वर मंदिर हे शंकराचे मंदिर आहे. त्यामुळे मी गेलो होतो, मुख्यमंत्री स्वत: येऊन गेले होते, अनेक मंत्री येऊन गेले, पण त्यांना या गोष्टीची सुतराम कल्पना असेल असे मला वाटत नाही. जर अशी कल्पना असती तर आम्ही कोणीच त्या ठिकाणी गेलो नसतो आणि त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले नसते,असेही केसरकर म्हणाले.
मी फक्त ईशान्येश्वरमध्ये एकदा पूजा केली आहे. याच्या पलीकडे मी कुठलीही पूजा त्यांच्या वतीने केलेली नाही. निव्वळ ओळख असल्याबद्दल काहीतरी बोलणं चुकीचे असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
