Deepak Kesarkar addresses Ashok Kharat allegations and clarifies his stance on the viral claims : शिंदे गटाचे नेते व माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातशी संबंध असल्यावरून टीकेला सामोरे जावे लागत आहे. खरात याच्या सांगण्यावरूनच केसरकर मंत्रालयात जायचे की नाही हे ठरवायचे. तर अनेक बैठकांसाठीही खरात यांनी परवानगी दिल्यावर केसरकर हजेरी लावत असल्याचा दावा देखील करण्यात आला. यादरम्यान दीपक केसरकर यांनी त्यांची अशोक खरात याच्याशी ओळख कशी झाली याबद्दल माहिती दिली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे.
अशोक खरात प्रकरणा नाव पुढे येत असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, “मी देवभक्त आहे, मी न चुकता शिर्डीला येतो. ते जे ईशान्येश्वर मंदिर आहे ते शिर्डीला येण्याच्या वाटेवर आहे. मी लहान असल्यापासून दर सोमवारी शिव मंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर कुठल्या शिव मंदिरात जायचं? तर मग ईशान्येश्वर मंदिरात जाणं झालं, त्या निमित्ताने ओळख झाली. ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असे नाही. त्यांना वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल, तर मी दोषी आहे. पण त्यांच्याकडून जे चुकीचं कृत्य घडलेलं आहे त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे,” असे केसरकर म्हणाले.
अशोक खरात या भोंदूबाबत जराही कल्पना कशी आली नाही? याबद्दल विचारले असता केसरकर म्हणाले की, “तेच दुर्दैव आहे की मी मंत्री असताना देखील तेथे येत होतो. त्यावेळी माझ्या बरोबर पोलीस असातचे, पोलिसांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती, नाहीतर त्यांनी मला सांगितलं असतं किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या काही भक्तांमध्ये अनेक शिक्षक होते, ज्यांच्यासाठी मी खूप काम केलं आहे. ते नेहमी आम्हाला सांगायचे की, तुम्ही शिक्षकांसाठी जेवढं काम केलं तेवढं कुठल्याच शिक्षण मंत्र्यांनी केलं नाही. मग त्यांना जर या गोष्टीची कल्पना असती तर त्यांनी आम्हाला सावध केलं असतं,” असे केसरकर म्हणाले.
“त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल आम्हाला कोणालाच काही माहिती नाही. ईशान्येश्वराच्या भक्तीपोटी त्यांची ओळख झाली. ओळख झाल्याचा जर फोटो निघाला तर त्याबद्दल काहीतरी बोलणं चुकीचं आहे. एका वृत्तपत्रात तर असं देखील छापून आलं की, ऑफिसमध्ये जायचं की नाही हे देखील ते मला सांगायचे. हे खूप चुकीचं आहे. श्रद्धा असते पण अंधश्रद्धा कधीही नसते,”
“माझ्या डिपार्टमेंटशी त्यांचा काहीही संबंध नाही. फक्त ईशान्येश्वर मंदिराच्या संदर्भात त्यांची ओळख झाली आणि ईशान्येश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे. त्यामुळे मी गेलो होतो, मुख्यमंत्री स्वत: येऊन गेले होते, अनेक मंत्री येऊन गेले, पण त्यांना या गोष्टीची सुतराम कल्पना असेल असं मला वाटत नाही. जर अशी कल्पना असती तर आम्ही कोणीच त्या ठिकाणी गेलो नसतो आणि ना त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले असते,”a असेही केसरकर म्हणाले.
माझंच नाव का? केसरकरांचा सवाल
अशोक खरात याच्यावर अघोरी पूजा करत असल्याबद्दल आरोप होत आहेत. याबद्दल विचारले असता केसरकर म्हणाले की, “हे आम्हाला माहिती असू शकत नाही, कारण एवढा वेळ मी त्यांच्या संपर्कात राहिलेलो नाही. मी कुठलीही पूजा केलेली नाही. मी फक्त ईशान्येश्वरमध्ये एकदा पूजा केली आहे. याच्या पलीकडे मी कुठलीही पूजा त्यांच्या वतीने केलेली नाही. निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणं चुकीचं आहे. इतकी लोकं भेटून गेले… जवळजवळ ३९ आमदार भेटून गेले, मग माझंच नाव का? हा प्रश्न आहे,: असे दीपक केसरकर म्हणाले.
