शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका केली होती. त्याला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. डुक्कर म्हणणे हे संजय राऊतांच्या तोंडी शोभते. मात्र, उद्धव ठाकरेंना हे शोभत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “उद्या तो नगरसेवक झाला तर त्याच्या…”; शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवावरुन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना नारायण राणेंचा टोला

काय म्हणाले दीपक केसरकर?

“दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे मी अस्वस्थ झालो होतो. माझी त्यांच्याशी बांधिलकी होती आणि पुढेही राहणार आहे. ही बांधिलकी त्यांच्या चांगल्या विचारसरणीबद्दल आहे. कोणालातरी डुक्कर म्हणणे हे संजय राऊतांच्या तोंडी शोभू शकते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.

“जेवढा आदर मला उद्धव ठाकरेंबद्दल आहे, तेवढाच आदर मला एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आहे. कारण ते खरे शिवसैनिक आहे. त्या शिवसैनिकांचा जर अपमान होत असेल, तर तो माझा अपमान असे मी समजतो. शिवसैनिकांचा अपमान मी बघू शकत नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “…मग तू काय काम करणार,” उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंची खोचक टीका; आजारपणाचाही केला उल्लेख, म्हणाले…

दरम्यान, यावेळी त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीबाबतही प्रतिक्रिया दिली. “आमची आणि भाजपाची युती आहे. जर भाजपा आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडू शकत असेल, तर आम्ही एका आमदाराकीसाठी हट्ट करणे योग्य नाही.”, असे ते म्हणाले.