scorecardresearch

“जिल्हा परिषद शाळेत नोंदणी आणि मदरशात हजेरी”, शिंदे-फडणवीस सरकारची भूमिका काय? शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले…

औरंगाबादमध्ये काही विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळेत नोंदणी असूनही ते मदरशात हजर राहत असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली.

Deepak Kesarkar Eknath Shinde Devendra Fadnavis
दीपक केसरकर, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस

औरंगाबादमध्ये काही विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळेत नोंदणी असूनही ते मदरशात हजर राहत असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणावर शिंदे-फडणवीस सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

दीपक केसरकर म्हणाले, “औरंगाबादमध्ये जे घडलं त्या प्रकरणात वस्तुस्थिती काय आहे, मदरशांमध्ये वेगळं शिक्षण दिलं जातं. ज्यांना तेथे प्रवेश घ्यायचा ते तिथं जाऊ शकतात. परंतु, प्राथमिक शाळेत आपलं नाव नोंदवायचं आणि मग तिथं गैरहजर राहायचं असं झालं तर ते चुकीचं आहे.”

“वेगवेगळ्या भाषेच्या शाळा चालवणारं महाराष्ट्र एकमेव राज्य”

“सर्वच मुलांनी आपलं नियमित शिक्षण घ्यावं. त्यामुळे त्यांचा विकास होऊ शकेल. राज्यात वेगवेगळ्या भाषेच्या शाळा चालवणारं महाराष्ट्र सरकार एकमेव आहे. आपण एकूण आठ भाषांमध्ये शिक्षण देतो. पुढील काळात आपण १० भाषांमध्ये शिक्षण देणार आहोत. महाराष्ट्र शासनाने विशाल दृष्टीकोन ठेवला आहे,” असं दीपक केसरकरांनी सांगितलं.

“मुलं कोणत्याही धर्माचे असोत, मुलभूत शिक्षण घेतलंच पाहिजे”

केसरकर पुढे म्हणाले, “आपण उर्दुतही शिक्षण देतो. त्या मुलांना उर्दुत शिक्षण घ्यायचं असेल तर उर्दुतही शिक्षण घेता येईल. आपल्या शिक्षण व्यवस्थेत मुलांचा सर्वांगिण विकास होतो. मुलं कोणत्याही धर्माचे असोत, त्यांनी मुलभूत शिक्षण घेतलंच पाहिजे. त्यासाठी प्रबोधन करावं लागलं, तर ते प्रबोधनही केलं जाईल. पालकांना बोलावून मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतली जाईल.”

हेही वाचा : “दीपक केसरकर अचानक कंठ फुटल्याप्रमाणे…” भास्कर जाधव यांचं बंडखोर आमदारांवर टीकास्र

“इतर कामांसाठी शिक्षकांचा वापर करणं चुकीचं”

“जेव्हा राष्ट्रीय कार्यक्रम असतात त्यावेळी शिक्षकांचा वापर करणं ठीक आहे. परंतु इतर कामांसाठी शिक्षकांचा वापर करणं चुकीचं आहे. कारण शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी, घडवण्यासाठी असतात. या दृष्टीने शिक्षकांना काय काय कामं दिली जातात याचा मी आढावा घेईन. मी सोमवारी शिक्षण खात्याची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत या सर्व गोष्टींवर चर्चा होईल,” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-09-2022 at 12:24 IST
ताज्या बातम्या