राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केलीय. तसेच नारायण राणे यांनी त्यांच्या मुलांना नियंत्रित न केल्यास जशी राणेंची राजकीय कारकीर्द संपली, तशीच त्यांच्या मुलांचीही राजकीय कारकीर्द संपेल, असा इशाराही दिला. यावेळी केसरकरांनी नारायण राणे शूर असल्याचं दाखवत असले तरी ते पोलिसांना घाबरतात असं म्हणत खोचक निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपक केसरकर म्हणाले, “नारायण राणे यांचा तोल गेलाय. राणे आपण किती शूर आहोत हे राणे दाखवत असले तरी ते पोलिसांना घाबरतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच नारायण राणे यांची रविवारची (२७ डिसेंबर) पत्रकार परिषद कुणावर आरोप करण्यापेक्षा आपल्या मुलाला वाचवण्यासाठी होती. प्रत्येक निवडणुकीला तुम्ही लोकांना धमकी देऊन निवडून येणार हा काळ आता संपला आहे.”

“कोण दीपक केसरकर या प्रश्नाच्या उत्तरासाठी ‘ती’ घटना आठवा”

“कोण दीपक केसरकर या प्रश्नाचं उत्तर आठवायचं असेल तर तुमचा आणि तुमच्या मुलाचा खासदारकीत झालेला पराभव आठवा. तुमच्या लक्षात येईल की कशाचीही परवा न करता जीवाची बाजी लावून जो लढला तो सर्वसामान्य कोकणचा माणूस होता. त्या कोकणाच्या माणसांचं प्रतिनिधित्व मी करतो म्हणूनच मी नारायण राणे यांना हरवू शकलो. आजही माझ्याशी लढाई करायची असेल तर ती विकासाच्या कामावर करा. राणे मुख्यमंत्री असूनही २५ वर्षात जेवढा निधी आणू शकले नाही तेवढा मी ५ वर्षात आणला,” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

“संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मी राणेंचा दहशतवाद मोडून काढला”

केसरकर पुढे म्हणाले, “नारायण राणेंनी मला कितीही हिणवलं तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मी राणेंचा दहशतवाद मोडून काढला. ते माझे व्यक्तिगत शत्रू नाही, आजही मी राणेंच्या मुलांना सुधरा म्हणून सांगतो. सुधारले तरच मुलांचं पुढलं आयुष्य चांगलं असेल. अन्यथा जसा नारायण राणे यांचा राजकीय अंत झाला, तसाच अंत राणेंच्या मुलांच्या राजकीय कारकीर्दीचाही होईल.”

“… केवळ म्हणून नारायण राणेंचा मुलगा निवडून आला”

“कोणत्याच कोकणाच्या माणसाचा कमीपणा व्हावा असं मला कधीच वाटलं नाही. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी ३ वेळा आमदार झालो. दुसरीकडे नारायण राणे पराभूत झाले. राणेंचा मुलगा केवळ तिरंगी लढत होती म्हणून निवडून आला ही देखील वस्तूस्थिती आहे,” असंही केसरकरांनी नमूद केलं.

“पोरकटपणा करू नका म्हणत फडणवीसांनी नारायण राणेंच्या मुलांना झापलं”

दीपक केसरकर म्हणाले, “आज नारायण राणे यांची मुलं कशी वागतात, स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना असा पोरकटपणा करू नका म्हणत झापलं. अजूनही नारायण राणे त्यांच्या मुलांवर नियंत्रण आणू शकले नाही, तर त्यांची दुसरी टर्म देखील अशीच फूकट जाईल. मी काही राणेंचा शत्रू नाही, पण दुसऱ्यांना कमी लेखायचं बंद करा.”

हेही वाचा : “बाबांनो, ‘हे’ करायला अक्कल लागते”, नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांचा हल्लाबोल

“राणेंनी मला डीपीसीच्या बैठकीत हिणवलं होतं, तेव्हा मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की, आज तुम्ही ज्या खुर्चीत बसला आहात त्याच खुर्चीवर मी बसेन आणि तेव्हा राणे सभागृहात नसतील. हे नियतीने खरं करून दाखवलं आहे,” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar warn narayan rane about his childrens political career pbs
First published on: 27-12-2021 at 21:27 IST