पश्चिम महाराष्ट्रात पेरण्या वरूणराजाच्या हवाली
पश्चिम महाराष्ट्रातही रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्राच्या पावसाने काही भागात हजेरी लावली असली तरी अद्यापि अनेक तालुक्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. वरूणराजावर हवाला ठेवून बळीराजानेसलग दोन वर्षांत दुष्काळामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना यंदा जोमदार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. खरीप हंगामात पिकांच्या पेरण्यांना सुरूवात केली आहे. माण पट्टय़ात यंदा सुदैवाने जोमदार पावसामुळे समाधानाचे चित्र दिसून येते.




मागील सलग दोन वर्षांत दुष्काळामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना यंदा जोमदार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. सोलापूर जिल्ह्य़ात रोहिणी नक्षत्राने सर्वदूर पाऊस झाल्याने आशा पल्लवित झाल्या. मात्र आता मृग नक्षत्राचा पाऊस तुलनेने कमी प्रमाणात होत आहे. तथापि, शेतक ऱ्यांनी पाऊस पडेल, असा विश्वास बाळगून खरीप पेरण्यांच्या तयारी वेगाने पूर्ण केली आहे. उत्तर सोलापूर, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, बार्शीत पुरेसा पाऊस होत नसतानादेखील शेतकऱ्यांनी वरूणराजावर हवाला ठेवला आहे. दुसरीकडे जिल्ह्य़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाचा साठा उणे ५२ टक्केवर पोहोचला आहे.
कोकणात पाऊस सुरू झाल्यानंतर कोल्हापुरातही पाऊस बरसतो. यंदा पावसाची सुरूवात चांगली झाली असली तरी कागल, हातकणंगले, शिरोळ, करवीर या भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शाहूवाडी, गगनबावडा येथे विशेषत्वाने चांगला पाऊस होत असल्यामुळे तेथील शेतकरी खूश आहेत. राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड येथे पाऊसमान समाधानकारक आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी माण पट्टय़ातील माणसह सांगोला, जत, खानापूर, विटा या एरव्ही दुष्काळाचा शाप असलेल्या भागावर यंदा रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्राच्या पावसाने कृपा केली आहे. त्यामुळे तेथील शेतकरीही पेरण्यांच्या गडबडीत आहेत. सांगली जिल्ह्य़ात सांगलीसह जत व मिरज येथे दमदार पाऊस होत आहे, तर दुसरीकडे बत्तीस शिराळा, इस्लामपूर, पळूस, कडेगाव आदी भागात तुलनेत कमी पाऊस होत असला तरी शेतकरी पावसाबाबत आशावादी आहेत. सातारा जिल्ह्य़ात माण-खटाव परिसरात यंदा चांगला पाऊस होत असल्याने तेथील ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. कराड, सातारा, वाई, खंडाळा या भागात वळिवाचा पाऊस झाला. मात्र मृग नक्षत्राने पाठ फिरविली आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात यंदाही मान्सूनच्या विलंबाने चिंता
मान्सूनच्या पावसाचा अंदमानपासून कोकणापर्यंतचा प्रवास २७ दिवस उलटले तरी अजून पूर्ण होऊ शकला नाही. कोकणात मान्सूनचे आगमन होण्यास अजून चार दिवस लागतील, असा नव्याने अंदाज व्यक्त केला गेला. या पाश्र्वभूमीवर ३ वर्षांपासून सातत्याने दुष्काळास तोंड देणाऱ्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पावसाच्या भरवशावर बाजारपेठेची उलाढाल अवलंबून असते. पावसाने ताण दिला की, बाजारपेठ आक्रसते. नवीन माल बाजारपेठेत येण्यास होणाऱ्या संभाव्य विलंबामुळे बाजारपेठेतील ताण वाढीस लागतो. एका पावसाने किती समस्यांना सामोरे जावे लागते हे गेल्या अनेक वर्षांंपासून मराठवाडा अनुभवतो आहे. त्यामुळे याही वर्षी मान्सूनचा पाऊस दगा देतो की काय? या भीतीने ग्रासले आहे.
या वर्षी मान्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागासह अनेकांनी गेल्या तीन महिन्यांपासूनच जाहीर केल्यामुळे सर्वाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. गेल्या दोन वर्षांत पावसाने ५० टक्क्यांवर सरासरी ओलांडली नाही. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन, पिण्याचे पाणी व बाजारपेठेची उलाढाल यावर प्रचंड मोठा परिणाम झाला. मराठवाडय़ातील सामान्य माणूस पुरता मेटाकुटीला आला आहे. दुष्काळाला सामोरे जाण्यासाठीची त्याची सहनशक्ती आता पुरती संपली आहे.साहजिकच या वर्षी मान्सून लांबला तर पुन्हा एकदा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी स्थिती निर्माण होते काय? या भीतीने सामान्यांच्या पोटात गोळा येत आहे. मृग नक्षत्रात पेरणी साधली की पीक नक्की चांगले येते याचा वर्षांनुवष्रे लोकांना अनुभव आहे. पाऊस लांबला म्हणून पेरणी लांबली, तर मृग नक्षत्रात पेरा केल्यामुळे हमखास येणारी मूग व उडीद ही दोन पिके घेताच येत नाहीत. गेल्या ४ वर्षांपासून या पिकांचे उत्पादन घसरणीला लागले आहे. सोयाबीन, तूर, ज्वारी या खरीप हंगामातील पिकांची पेरणी जेवढी लवकर तेवढी फलदायी असते. पेरणीला उशीर झाला की त्याची वाढ नीट होत नाही. कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे उत्पादन घटते. शिवाय काढणीच्या वेळी पावसात रास अडकण्याची भीती असते. गेल्या वर्षभरापासून मराठवाडय़ातील गावोगावी टँकरची वाट पाहण्यात प्रचंड वेळ जात आहे. पाऊस जितका लांबेल तितकी पाण्याची समस्या वाढणार आहे. देशात पहिल्यांदाच ६० दिवसांपेक्षा अधिक काळ एखाद्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. पाऊस लांबला तर आणखी किती दिवस रेल्वे चालवावी लागेल, हे निश्चित सांगता येत नाही. पिण्याच्या पाण्याच्या रांगा व पाण्यासाठीचे तिष्ठने अधिक काळ वाढेल. सोमवापर्यंत मराठवाडय़ात सरासरी ६० मिमीच पाऊस झाला. त्यातही कळंबसारख्या तालुक्यात केवळ ३४ मिमी इतका कमी पाऊस झाला.
विदर्भात पाऊस लांबल्याने हंगाम बिघडला
भारतीय हवामान खाते आणि हवामानाचा अंदाज वर्तवणारी खासगी संस्थेने यंदा भरपूर पाऊस पडणार, असे भाकित वर्तवले. मात्र, मान्सूनचे विदर्भातील आगमन पुढे ढकलले गेल्याने पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता चिंतेचे सावट दिसू लागले आहेत.
जूनच्या पहिल्या आठवडय़ात साधारणपणे मान्सूनची नांदी मिळते आणि शेतकरी खरीपाच्या तयारीला लागतो. गेल्या तीन-चार वर्षांंपासून पाऊस सतत हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांचे गणितही बिघडले आहे. यंदा भरपूर पावसाचे संकेत सरकारी व खासगी हवामान संस्थेने दिल्यामुळे शेतकरी खरीपाच्या पेरणीकरिता पूर्णपणे तयारीत आहेत. मात्र, केरळमध्येच मान्सूनने उशिरा आगमन केल्यामुळे महाराष्ट्रातील त्याचे आगमन लांबले आहे. जूनच्या अखेरच्या आठवडय़ात तो बरसण्याचे संकेत मिळाल्याने शेतकरी चिंतातूर आहे. पहिला पाऊस बरसल्यानंतर सोयाबीन, उडीद, मूग ही पिके तो घेतो. संपूर्ण विदर्भात धानाचे पीक होते, तसेच खरिपात संकरित ज्वारीचे पीकही घेतले जाते. जूनमध्ये पेरणीला सुरुवात केली जाते. याच महिन्यात पाऊस चांगला बरसला, तर एकरी किमान आठ ते दहा क्विंटल सोयाबीनचे पीक होते. मात्र, पावसाने दडी मारली तर हे उत्पादन अध्र्याहूनही अध्रे होते. गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्याने एकरी केवळ दोन क्विंटल एवढेच उत्पादन झाले. शिवाय, जूनमध्ये सुरुवातीला पाऊस चांगला पडल्यानंतर शेतकऱ्यांनी लगेच पेरणी केली आणि नंतर पाऊस गायब झाल्यने पेरणी वाया गेली. यंदा मात्र पेरणीची पूर्ण तयारी शेतकऱ्यांनी केली असून ते आकाशाकडे डोळे लावून बसला आहेत.