दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’नं मोठा विजय संपादन केला. दोन राष्ट्रीय पक्षांना धूळ चारत ‘आप’नं दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी 63 जागांवर विजय मिळवला. सलग दुसऱ्यांदा आपनं साठपेक्षा अधिक जागा घेत बहुमतापेक्षा जवळपास दुप्पट जागा मिळवल्या आहेत. मात्र, ‘आप’च्या या विक्रमी विजयापेक्षा भाजपाच्या पराभवाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. शिवसेनेनं दिल्लीच्या निकालावर भाष्य करताना भाजपाला खडे बोल सुनावले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचा विजय झाला. या निकालाचं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून विश्लेषण केलं आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन करताना टोमणे लगावले आहेत. “दिल्लीच्या विधानसभेत कोणत्या प्रश्नांवर निवडणुका लढवाव्यात यावर भाजपात नेहमीप्रमाणे गोंधळ उडाला. नेहमीप्रमाणे येथेही हिंदू-मुसलमान, राष्ट्रवाद आणि देशद्रोह याच विषयांवर भारतीय जनता पक्षाने प्रचार केला व मते मागितली, पण दिल्लीतील सर्वच थरांतील मतदारांनी हे सर्व विषय ठोकरून लावले व केजरीवाल यांनी पाच वर्षांत जे काम केले त्यावरच मतदान केले. केजरीवाल यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली. असे आपल्या निवडणुकीत सहसा घडत नाही. भावनिक आणि धार्मिक मुद्दय़ांवरच भर दिला जातो. भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे दिल्लीत तेच केले. केजरीवाल यांनी केलेल्या कामांच्या जोरावर सत्ता पुन्हा मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली. भाजप हिंदू-मुसलमान, पाकिस्तान वगैरे बोंबलत बसले. ”केजरीवाल हे एक नंबरचे आतंकवादी आहेत” असे भाजपने जाहीर केले, पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या ‘आप’चा झाला. ‘आपमतलब्यां’चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळय़ांना साफ केले. केजरीवाल यांचे अभिनंदन!,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

शाह यांना एक विजय मिळवायचा होता, पण…

“दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा विजय झाला यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षाही दिल्लीची निवडणूक गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिष्ठेची केली होती. जयप्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, पण दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे सूत्रधार अमित शहा हेच होते. पक्षाचे अध्यक्षपद सोडताना त्यांना एक विजय मिळवायचा होता. ते शक्य झाले नाही. झारखंडमध्ये पराभव झाला व ध्यानीमनी नसताना महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे गेले. देशाच्या राजधानीवर ‘आप’चा झेंडा फडकला, तर आर्थिक राजधानीवर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्य करीत आहे. हा बाण काळजात आरपार खुपणारा आहे. दिल्ली विधानसभेचा निकाल पाहिला तर एकटे केजरीवाल हे संपूर्ण केंद्र सरकार व शक्तिमान भाजपला भारी पडले आहेत. केजरीवाल यांच्या पराभवासाठी भाजपने देशभरातील अडीचशे खासदार, दोन-चारशे आमदार, मुख्यमंत्री तसेच राज्यांचे मंत्री व संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ मैदानात उतरवले होते, पण त्या सर्व फौजांचे शेवटी दिल्लीच्या मैदानावर साफ पानिपत झाले. अहंकार, मस्तवालपणा आणि ‘हम करे सो कायदा’ या वृत्तीचा हा पराभव आहे,” अशी टीका शिवसेनेनं भाजपावर केली आहे.