रत्नागिरी – दिल्लीत झालेल्या बॉम्ब स्फोटाचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यात देखील उमटले आहेत. या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनारी सुरक्षा वाढविण्यात येवून कडक तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येवून बॉम्ब शोधक पथकाकडुन तपासणी केली जात आहे.
दिल्लीत झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या गंभीर घटनेनंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या स्फोटाचे थेट पडसाद आता महाराष्ट्राच्या संवेदनशील अशा कोकण किनारपट्टीवर देखील उमटले आहेत. संपूर्ण सागरी पट्ट्यात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकणातील तब्बल ५२५ लँडिंग पॉईंट ‘संवेदनशील’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली असून सर्वच सागरी आणि रस्ते मार्गावर करडी नजर ठेवण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाकडून सागरी किनारी भागात गस्त वाढवण्यात आली आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारी नौकांवर आणि त्यांच्या हालचालींवर पोलीसां कडून जास्त लक्ष ठेवले जात आहे. तसेच सागरी महामार्गावरून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरही पोलिसांनी गस्त वाढविली आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी करून येणाऱ्या-जाणाऱ्या संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
कोकण किनार पट्टीवर सुरक्षेचा उपाय म्हणून किनारी भागात बॉम्ब शोध पथक व ‘शिवानी’ पथकाकडून देखील सुरक्षा तपासणी केली जात आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहून कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी केले आहे.
