दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज महाराष्ट्रातही उमटले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर रस्त्यावर उतरले. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तुपकरांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध केला. आज सकाळी नागपूरातील बेसा चौकात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले व केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने ताबडतोब दखल घेवून तोडगा काढावा, महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पूर्ण ताकदीने सोबत आहे असं म्हणत हे आंदोलन करण्यात आले.

आणखी वाचा- “जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरून उतरून विचार करा आणि…”

अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल – रविकांत तुपकर

“शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी लाखों शेतकरी दिल्लीत ६ दिवसांपासून ठाण मांडून आहेत. पंरतु केंद्र सरकार मस्तीमध्ये आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. केंद्र सरकारने ३ दिवसात तोडगा न काढल्यास संबंध देशातील शेतकरी तर रस्त्यावर उतरतीलच. पण महाराष्ट्रातही आंदोलनाचा भडका उडवू,”असा इशारा तुपकरांनी दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Delhi farmers protest maharashtra farmers support them swabhimani shetkari sanghatna nagpur raju shetty jud

ताज्या बातम्या