…म्हणून निर्भयाच्या बलात्काऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यावी: अमृता फडणवीस

“त्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यायला हवी असं मलाही मनापासून वाटतं कारण…”

अमृता फडणवीस

दिल्ली सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण लागण्याची शक्यता शुक्रवारी निर्माण झाली आहे. या प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी मुकेश सिंह याने त्याच्या पूर्वीच्या वकिलांवर आरोप करीत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी असतो, ही माहिती आपल्याला देण्यात आली नाही असा दावा मुकेशने केला आहे. आपल्याला अन्य कायदेशीर उपायांचा वापर करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुकेशने न्यायलयाकडे केली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची फाशी पुढे ढाकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या प्रकरणातील आरोपींना भरचौकात फाशी देण्यात यावी असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमृता यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात भाष्य करताना दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाचा उल्लेख केला. “स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी समाजातून होत असते. अगदी त्यांना फासावर लटकवा किंवा स्त्रीया अशा नराधमांना आमच्या हातात द्या आम्ही त्यांना शिक्षा देतो अशीही मागणी करताना दिसतात. अशापद्धतीने कायदा हातात घेणं किती योग्य आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं,” असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना, स्त्रियांची अत्याचार सहन करण्याची सहनशक्ती संपल्याचे मत अमृता यांनी मांडले. “स्त्रिया वर्षानुवर्ष खूप सहन करत आलेल्या आहेत. आता अन्याय सहन करण्याची स्त्रियांची सहनशक्ती संपलेली आहे. त्यामुळे आता स्त्रियांना कायदा हातात घ्यायची इच्छा होतेय,” असं अमृता म्हणाल्या. पुढे बोलताना, “दिल्लीतील निर्भया प्रकरणामधील आरोपी स्वत:ला वाचवण्याचे किती प्रयत्न करतोय हे आपण पाहतोच आहे. मात्र अशा माणसांना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यायला हवी असं मलाही मनापासून वाटतं. असं केलं तर अशा पद्धतीने शिका होईल अशी भिती निर्माण झाली पाहिजे लोकांमध्ये. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये कोणत्या मुल्यांचे जतन करावे याबद्दल लोकं विचार करण्यास सुरुवात करतील,” असं अमृता म्हणाल्या.

पुरुषी अहंकारावर भाष्य…

तसेच यावेळी बोलताना अमृता यांनी पुरुषी अहंकारावरही भाष्य केलं. “देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्यापेक्षा माझा पगार जास्त असल्याचा अभिमान आहे याचा गर्व मला वाटतो. देवेंद्र यांना पुरुषी अहंकार नसल्याचा आनंद आहे,” असंही अमृता यावेळी बोलताना म्हणाल्या. “महिला अत्याचाराच्या अनेक घटना आपल्याला आजूबाजूला दिसून येतात. एकीकडे स्त्रिया वेगळीच उंची गाठतायत. दुसरीकडे पुरुषी अहंकारामुळे आज महिलांचा छळ होताना दिसत आहे. कुठेतरी स्त्रिला जाळलं जातयं, तिच्यावर अॅसिड फेकलं जातयं. हे सर्व पाहून समाज म्हणून खूप वाईट वाटतं. पण यामध्ये बदल घडवायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला आपली मानसिकता बदलायला हवी,” असं मत अमृता यांनी व्यक्त केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Delhi gang rape case convicts should be hanged in public says amruta fadnavis scsg